ज्वारीची भाकरी पचायला हलकी, पण खिशाला झाली भलतीच जड!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:47 AM2023-08-09T11:47:53+5:302023-08-09T11:48:27+5:30
मधुमेही, हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ठरली वरदान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महागाईने डोके वर काढले असून, डाळीपासून कडधान्य, तृणधान्ये महागली आहेत. ज्यात मधुमेही तसेच हृदयविकाराच्या रुग्णांमार्फत सेवन केल्या जाणाऱ्या ज्वारीचाही समावेश आहे. मात्र, ज्वारीची भाकरी पचायला जितकी हलकी तितकीच खिशाला मात्र जड झाली आहे.
म्हणून ज्वारी हेल्दीच
ज्वारी हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे म्हणजे ते रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
परिणामी ते मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.
तसेच ज्वारीमध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे हाडांचे आरोग्य राखण्यास, ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास आणि हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
तूर डाळही वधारली
डाळ-भात आणि लोणचे हे सर्वसाधारण माणसाचे नेहमीचे जेवण असते. अगदीच काही नसेल तर वरण भाताने बऱ्यापैकी पोट भरते. मात्र, या तूर डाळीची किंमतही १४० ते १७० रुपयांवरून आता १८० ते १९० रुपये झाली आहे. जवळपास ३० ते ३५ रुपयांनी या किमती वाढलेल्या आहेत.
ज्वारीने खाल्ला भाव
सध्या बाजारात ज्वारी प्रती किलो ६२ ते ६८ रुपयाने मिळत आहे. या किमती पूर्वी ४५ ते ५० रुपये किलोच्या घरात होत्या. त्यामुळे ज्वारीने यावेळी जास्त भाव खाल्ल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
गहूदेखील झाला महाग
गहू हा पचायला जड आणि मधुमेहींसाठी फार चांगला मानला जात नसला तरी त्याच्याही किमतीत वाढ झाली आहे. गहू हा ३५ ते ४० वरून ४५ ते ५५ रुपयांपर्यंत महागला आहे. तसेच विशिष्ट जातीचे आणि आरोग्यदायी समजले जाणारे गहू हे किलोमागे शंभरी पार करत आहेत.
मागणी अधिक... पुरवठा कमी !
सध्या डाळी, कडधान्य तसेच ज्वारी, बाजरीसारखी तृणधान्येही २६ ते ३० रुपयांच्या फरकाने महाग झाली आहेत. ही महागाई पुढे पुढे वाढत जाणार. कारण मध्य प्रदेश, पंजाब, नाशिक तसेच राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या पिकांचे पावसाच्या गोंधळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. - हितेंद्रसिंह जडेजा, धान्य व्यापारी
शहरातही मागणी
ज्वारी, बाजरी ही पूर्वी फक्त ग्रामीण भागात अधिक खाल्ली जायची. आता मात्र आरोग्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हे समजल्यानंतर शहरातही त्याला तेवढीच मागणी आहे. मात्र आता वाढलेल्या किमतीमुळे ती खाणे कितपत परवडेल हा प्रश्न आहे. - यशोदा तामसे, गृहिणी
दळणाचे पैसेही वाढले
पोळी आणि भाकरी करण्यासाठी सामान्य माणसाला परवडणारे ज्वारी, गहू महाग झाले आहेत. इतकेच नाही तर ते दळायला प्रती किलो १० ते १४ रुपये आकारले जातात. त्यामुळे हे खूप महागात पडते.
- रश्मी चिंदरकर, गृहिणी
शहरातही मागणी
ज्वारी, बाजरी ही पूर्वी फक्त ग्रामीण भागात अधिक खाल्ली जायची. आता मात्र आरोग्यासाठी ती किती महत्त्वाची आहे हे समजल्यानंतर शहरातही त्याला तेवढीच मागणी आहे. मात्र आता वाढलेल्या किमतीमुळे ती खाणे कितपत परवडेल हा प्रश्न आहे. - यशोदा तामसे, गृहिणी
ज्वारीचे पदार्थ कोणते?
ज्वारीपासून भाकरीसह धिरडे, अप्पे, थालीपीठ, खिचडी, पापड , लाडू तसेच त्यांना भाजून त्याचे पॉपकॉर्नही बनवून ते खाल्ले जातात.