पूर्वीची मेडिक्लेम योजना सुरू करा!
By admin | Published: March 21, 2017 02:19 AM2017-03-21T02:19:29+5:302017-03-21T02:19:29+5:30
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी २६ जुलै २०१३ साली सुरू केलेली मेडिक्लेम
मुंबई : महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी २६ जुलै २०१३ साली सुरू केलेली मेडिक्लेम योजना २० आॅगस्ट २०१५ रोजी संपली आहे. त्याला पर्यायी योजना म्हणून सरकारने महात्मा फुले (राजीव गांधी) जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र या योजनेत सर्वसामान्य आजारांचा समावेश नसल्याने सरकारने बांधकाम कामगारांसाठी पूर्वीचीच मेडिक्लेम योजना पुन्हा लागू करावी, या मागणीसाठी भारतीय ट्रेड युनियन केंद्राने सोमवारी आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे.
आघाडी सरकारने ८४ हजार नोंदीत बांधकामगारांसाठी ३४ लाख रुपयांची मेडिक्लेम व अपघाती विमान पॉलिसी उतरविली होती, असे युनियनचे सरचिटणीस अॅड. एम.एच. शेख यांनी सांगितले. शेख म्हणाले की, या योजनेमध्ये पहिल्या वर्षी नोंदीत कामगारांना मेडिक्लेम कार्ड वाटण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही कागदपत्राशिवाय कार्ड दाखवून कामगाराला स्वत:सह कुटुंबियांना जिल्ह्यातील नामवंत रूग्णालयांत मोफत उपचार घेता येत होते. सुरूवातीला २६ जुलै २०१३ ते २५ जुलै २०१४ पर्यंत या योजनेची मुदत होती. त्यानंतर २७ आॅगस्ट २०१४ रोजी ही योजना पूर्ववत सुरू करण्यात आली. यावेळी सुमारे २ लाख नोंदीत कामगार व त्यांच्या कुटुंबातील सहा व्यक्तींसाठी पूर्वीप्रमाणेच योजनेचे नुतनीकरण केले. त्यासाठी मंडळाने २४ कोटी रुपयांची आरोग्य विमा पॉलिसी उतरविली. तर योजनेंतर्गत राज्यात १६ कोटी ५० लाख रुपये खर्च झाले. मात्र चांगला प्रतिसाद मिळूनही २० आॅगस्ट २०१५ पासून ही योजना मुदत संपल्याने बंद झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी महात्मा फुले जीवनदायी आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचे निर्देश दिले. त्याऐवजी पूर्वीचीच योजना पूर्ववत करावी, अशी युनियनची मागणी आहे. (प्रतिनिधी)