मुंबईसह राज्यभरात चतुर्थ श्रेणी सरकारी कर्मचारी दोन दिवस संपावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 01:11 PM2017-09-21T13:11:26+5:302017-09-21T14:44:23+5:30
राज्यभरात कामगार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगार वर्गानं आपल्या विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
मुंबई, दि. 21 - राज्यभरात कामगार रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कामगार वर्गानं आपल्या विविध मागण्यांसाठी रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. सरकारने मागण्या मान्य करूनही त्याची अंमलबजावणी करण्यास होत असलेल्या दिरंगाईच्या कारणावरून राज्यातील सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गाने संपाचे हत्यार उपसले आहे.
सरकारच्या निषेधार्थ राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आज व उद्या (22 सप्टेंबर ) असे दोन दिवस संप पुकारला आहे. संपानंतरही सरकारने कोणतीही कार्यवाही केली नाही तर 27 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.
ठाणे
ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयातील राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांचा संप. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजाणीसाठी व विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्या कर्मचा-यांनी गुरुवारी रुग्णालयाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. शेकडो कर्मचा-यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
औरंगाबाद
घाटी येथील शासकीय रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर गेल्यानं साफसफाईसह विविध कामांवर परिणाम झाला आहे.
यासाठी उपसलं आंदोलनाचे हत्यार
अनुकंपा सेवाभरती विनाअट करावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी वर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी गुरुवार व शुक्रवार असे दोन दिवस सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी राज्यव्यापी संपावर गेले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी होणार असून याला ३० हून अधिक संघटनांनी पाठींबा दिला आहे.
या संपाबाबत पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील व्यापक शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला इशारा दिला होता. संघटनेतर्फे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. हा संप राज्यव्यापी असून राज्यभरात साडेतीन लाखहून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप एकही मागणी शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे कर्मचा-यांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.
या संपात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), महसूल, शिक्षण, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तंत्रशिक्षण विभाग, कोषागार कार्यालय, विक्रीकर, आरोग्य, वैद्यकिय शिक्षण आदी विभागातील शिपाई, सफाई कामगार, वॉर्ड बॉय, चपरासी, चौकीदार, मुकादम, मजूर असे जवळपास तीन हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती या शिखर संघटनेने पाठींबा दिला आहे तर तीसहून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी पाठींबा देऊन सक्रीय सहभाग घेतला आहे.
आंदोलकांच्या मागण्या
-वैद्यकीयदृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचा-यांच्या पाल्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे.
-सर्व खात्यांतील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांची रिक्त पदे तत्काळ भरावीत.
-पदे भरताना चार टक्क्यांची अट रद्द करावी. सर्व खात्यांतील चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांना गृहखात्याप्रमाणे शासकीय वसाहत बांधून द्यावी.
-चतुर्थ श्रेणीमधून तृतीय श्रेणीमध्ये २५ टक्क्यांऐवजी पाच टक्के पदोन्नती करताना चतुर्थ श्रेणीची पदे निरसित करू नयेत.
-सातवा वेतन आयोग फरकासह तत्काळ मंजूर करावा.
- महापालिका, नगरपालिका यांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा.