विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेशासाठी निवडाव्या १० शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:04 AM2018-01-17T04:04:38+5:302018-01-17T04:04:48+5:30
मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारात (आरटीई) वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मुंबई : मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकारात (आरटीई) वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना फक्त १० शाळांची निवड करता येणार असल्याचे शालेय विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळा विनाकारण विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारतील त्या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आरटीईअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रवेश देणे बंधनकारक आहे. ज्या शाळांनी येथे नोंदणी केली आहे, त्यांनी २५ टक्के जागा या वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या पाहिजेत. काही शाळा या २५ टक्के प्रवेशाकरिता पात्र आहेत. पण, या शाळा नोंदणीच करत नाहीत. अशा शाळांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, या शाळांना नोटीस देण्यात येणार आहे.
आरटीई प्रवेश हे आॅनलाइन लॉटरीमार्फत दिले जातात. पण, काही विद्यार्थ्यांना लॉटरीतर्फे शाळांमध्ये प्रवेश मिळूनही ते नाकारले जातात. या शाळा विद्यार्थ्यांचा शिक्षणाधिकार नाकारतात. त्यामुळे हेतुपुरस्सर प्रवेश नाकारल्याचे आढळल्यास शाळेची मान्यता काढून घेण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.