सुसाट मेट्रो-३ कामाच्या भरमसाट तक्रारी, उपनगर जिल्हाधिका-यांकडे धाव, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी, वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:06 AM2017-11-20T01:06:39+5:302017-11-20T01:06:52+5:30
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग-३ प्रकल्पाच्या भुयारी कामाचा प्रारंभ माहिम येथील नयानगरमधून नुकताच झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र, मेट्रोबाबतची काही ठिकाणांवरील नाराजी अद्यापही दूर झालेली नाही.
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो भुयारी मार्ग-३ प्रकल्पाच्या भुयारी कामाचा प्रारंभ माहिम येथील नयानगरमधून नुकताच झाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र, मेट्रोबाबतची काही ठिकाणांवरील नाराजी अद्यापही दूर झालेली नाही. विशेषत: गिरगाव, काळबादेवी, माहिम, मरोळ येथील नागरिकांना मेट्रोच्या कामाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने किमान आमचे म्हणणे तरी ऐकावे, अशी विनंती रहिवाशांनी केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन तक्रारी ऐकून घेत नसल्याचे म्हणणे तक्रारदारांनी मांडले असून, गोरेगाव येथील तक्रारदारांनी आपल्या प्रश्नांसाठी आता थेट उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे दार ठोठावले आहे.
मेट्रो-३ च्या कामामुळे स्थानिकांना भयंकर मनस्ताप होत आहे़ या कामामुळे हेरिटेज इमारतींना हादरा बसत आहे़ त्यामुळे मेट्रो-३ चे काम सुसाट सुरू असले तरी या कामाच्या भरमसाट तक्रारी असल्याचे चित्र आहे़ माहिम येथून मेट्रोच्या कामाबद्दल चीड व्यक्त केली जात आहे. कारशेडसाठी तोडण्यात येणाºया झाडांबाबत नाराजी व्यक्त करत ‘चिपको आंदोलन’ झाले.
मेट्रो-३ ला होत असलेला विरोध पाहता, नेमके हे काम कसे सुरू आहे? याबाबत कॉर्पोरेशनकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या कामासाठी खणलेल्या भागास मजबुती देण्यासाठी करावी लागणारी सिकंट पायलिंगची कामे, सध्या सर्व प्रस्तावित स्थानकांच्या जागी सुरू आहेत. उच्च क्षमतेच्या पायलिंग मशिन्सच्या साहाय्याने केल्या जाणाºया पायलिंगमुळे काही प्रमाणात कंपने जाणवू शकतात. मात्र, ही कंपने ऐतिहासिक अथवा जुन्या इमारतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने विहित केलेल्या मर्यादेच्या एक चतुर्थांश प्रमाणापेक्षाही कमी आहेत. पायलिंगमुळे होणाºया कंपनांचे नियमितपणे प्रमाणित उपकरणाद्वारे मापन केले जाते. तीन ते चार महिन्यांत पायलिंगचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
कॉर्पोरेशनने कामाचा खुलासा केला असला तरी मेट्रो-३ च्या कामामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे़ याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे़ अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागत आहे़ हे काम कधी एकदा संपेल, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत़
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या स्थानकांचे काम कट अँड कव्हर व न्यू आॅस्ट्रियन टनालिंग पद्धतीने होणार. या दोन्ही पद्धतीत जमिनीच्या २५-३० मीटर खाली खोदकाम करावे लागणार.मेट्रो-३ चे भुयारीकरण १७ टनल बोअरिंग मशिनद्वारे करण्यात येणार आहे. मशिनद्वारे जमिनीच्या २५-३० मीटर खाली खोदकाम करण्यात येणार आहे. सर्व मार्गिकेत मुख्यत: खडकांचा समावेश आहे.टनेल बोरिंग मशिन भूगर्भात २५ ते ३० मीटर इतके खोल जाऊन खोदकाम करते. जमिनीखालील खडकाळ भागात कुशलतेने काम करणे ही टनेल बोअरिंग मशिनची खासियत आहे. ३३.५ किलोमीटर इतक्या लांब दुहेरी टनेलचे काम करण्यासाठी एकूण १७ टनेल बोअरिंग मशिनचा वापर करण्यात येणार आहे.बारा मशिन्सची फॅक्टरी स्वीकृती चाचणी पार पडली आहे. चार मशिन्सचे आगमन झाले आहे. उर्वरित १३ मशिन्सचे आगमन फेब्रुवारीमध्ये होईल. तीन मशिन्स भूगर्भात उतरल्या असून, एक मशिन कार्यान्वित झाली आहे. संपूर्ण मार्गिकेच्या टनेलिंगचे काम दोन वर्षांत पूर्ण होईल. मुंबई मेट्रो-३ डिसेंबर २०२१ रोजी कार्यरत होईल.बांधकामादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देखरेख उपकरणांचा व उपाययोजनांचा समावेश करण्यात आला आहे. इमारतीच्या देखरेखीसाठी बिल्डिंग सेटलमेंट मार्कर, क्रॅक मीटर, इनक्लीनोमीटर, रोड एक्सटेन्सोमीटर, सॉइल सेटलमेंट मार्कर, पव्हमेंट सेटलमेंट मार्कर, पिजोमीटर, व्हायब्रेटिंग वायर, टील्ट मीटर, व्हायब्रेशन व व्हॉइस मॉनिटर, टील्ट मीटर, सिस्मोग्राफर, लोड सेल व स्टेÑन गेज, शॉटक्रिट टेस्ट उपकरण, वॉटर स्टँड पाइप या उपकरणांचा यामध्ये समावेश आहे.बांधकाम सुरू करण्यापूर्वी कंत्राटदारांच्या तज्ज्ञांमार्फत बांधकाम क्षेत्रात येणाºया सर्व इमारतींच्या स्थितीचे सर्वेक्षण केले जाते.
त्यामध्ये इमारतीची सद्य:स्थिती, इमारतीवरील भेगा व इतर बाबींचे मापन केले जाते.
सर्वेक्षणाच्या आधारे इमारतीच्या मजबुतीच्या निकषावर स्थानकाचे संरेखन आणि भुयारीकरणाची पद्धत ठरविली जाते.
बांधकाम करताना इमारतीची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी इमारतीच्या स्थितीनुसार, योग्य ती उपकरणे इमारतींवर लावली जातात.
बांधकाम क्षेत्रातील इमारतींची कंपन मर्यादा ठरविली जाते.
बांधकामाच्या कुठल्याही पातळीवर ठरविलेल्या मर्यादेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी नियमितपणे देखरेख ठेवली जाते.
कंपने मर्यादेपेक्षा जास्त पातळी ओलांडत असल्याचे लक्षात आल्यास, तत्काळ काम बंद केले जाते.
सुरक्षेच्या सर्व उपाययोजनांचा वापर करत, पुढील कामाला सुरुवात केली जाते.
>मार्गिकेतील सात वेगवेगळ्या ठिकाणी टनेल बोअरिंग मशिन भूगर्भात उतरविण्यात येणार असून, सात ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत...
स्टेशन्स लॉचिंग शाफ्ट टीबीएम
मशिन
कफ परेड ते हुतात्मा चौक कुलाबा वूड्स, कफ परेड २
छत्रपती शिवाजी आझाद मैदान, छत्रपती २
महाराज टर्मिनस शिवाजी महाराज टर्मिनस
मुंबई सेंट्रल ते वरळी सायन्स म्युझिअम, वरळी २
सिद्धिविनायक ते शितलादेवी नया नगर, माहिम ३
वांद्रे-कुर्ला संकुल ते सांताक्रुझ विद्यानगरी, कलिना ३
राष्ट्रीय विमानतळ ते सहार रोड, अंधेरी पूर्व २
आंतरराष्ट्रीय विमानतळ
मरोळ नाका ते कार डेपो पाली ग्राउंड, मरोळ नाका ३
>किमान तक्रारी तरी ऐका
मेट्रो-३ चे काम मरोळ नाका येथेही सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, रात्रीही येथे मेट्रोचे काम सुरू असते. या संदर्भात येथील रहिवासी गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, आम्ही कित्येक वेळा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे रात्री सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाबद्दल तक्रारी केल्या. मात्र, कॉर्पोरेशनकडून तक्रारींची काहीच दखल घेण्यात येत नाही. किमान त्यांनी तक्रारींची दखल घ्यावी, अशी अपेक्षा असते. तक्रारींची दखलच घेतली जात नसेल, तर समस्या सुटणार कशा? हा प्रश्नच आहे.
>उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनी येथील प्रजापूरपाडा मधील मेट्रो-३ च्या पायाभूत सर्वेक्षणात डावललेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन रखडले आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व्हावे, यासाठी मेट्रो प्रशासनाला आणि सरकारला अनेक पत्रव्यवहार करण्यात आले, परंतु कोणतेही प्रशासन प्रकल्पग्रस्तांकडे लक्ष देत नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ता भानुदास सकटे यांनी व्यक्त केली आहे.
२०१४-१५ साली येथील सर्व्हे करण्यात आला. यानंतर, दोन वर्षे मेट्रो प्रशासनाने काहीही काम केले नाही. मे महिन्यात एक दिवस आधी झोपड्या तोडण्याची नोटीस देऊन घरे जमीनदोस्त करण्यात आली. प्रकल्पग्रस्त सद्यस्थितीला भाड्याच्या घरात वास्तव्याला आहेत.
गरिबांना भाड्याच्या घरात राहणे परवडत नाही. मेट्रो प्रशासनाने लवकरच पर्यायी घरे द्यावीत, असेही सकटे यांनी सांगितले. दरम्यान, आता या प्रकरणी न्याय मिळावा, म्हणून मुंबई मेट्रो-३ प्रकल्पग्रस्त कृती समितीने उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासह गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा फटका मुंबई महापालिकेला बसला आहे. या प्रकल्पाचे काम गेल्या वर्षी सुरू झाल्यापासून तब्बल सात वेळा मुख्य जलवाहिनी फुटली आहे. यामुळे हजारो लीटर्स पाणी वाया गेले आहे. परिणामी, रहिवाशांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे. फोर्ट व आसपासच्या परिसरात जलवाहिनी फुटण्याच्या घटना घडल्या होत्या. याची दखल घेत, महापालिकेने मेट्रो प्रकल्प व्यवस्थापकाला नोटीसद्वारे खडसावले होते. सात वेळा जलवाहिनी फुटल्याने महापालिकेने मेट्रोला आतापर्यंत ११ लाख ११ हजार रुपये दंड केला आहे.
विरोध आणि आंदोलन
चर्चगेट, कुलाबा, गिरगाव, मरोळ, सिद्धार्थ महाविद्यालय, जे. एन. पेटीट आणि गोरेगाव येथे मेट्रो-३ विरोधात यापूर्वीच आंदोलने छेडण्यात आली आहेत.
नाराजीचा सूर
गिरगाव आणि काळबादेवी येथील रहिवाशांनी मेट्रोला यापूर्वीच विरोध दर्शविला होता. आता माहिमकरांनीही मेट्रोविरोधात नाराजीचा सूर लावला आहे. माहिम येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे लगतच्या परिसरातील बांधकामांना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.
>पर्यावरणतज्ज्ञ म्हणतात...
भुयारी रेल्वेचा मार्ग व स्थानके सुमारे ९० ते १२० फूट म्हणजे ९ ते १२ मजले खोलवर असणार आहेत. वीज गेल्यास किंवा इतर अपघात झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. मुंबईत गाड्या थांबल्यास स्टेशनांवर काही मिनिटांत हजारो माणसांची गर्दी उसळते. मुंबईच्या भूगर्भातील वाळू व इतर थर खचू शकतात. काही दुर्घटना घडल्यास इतक्या खोलीवरून वेगाने बाहेर पडणे शहराच्या धकाधकीने थकलेल्या मुंबईकरांना शक्य नाही. हजारो माणसे बळी पडतील. याच्या वातानुकूलनामुळे बाहेर मुंबईत तापमान वाढणार आहे. प्रकल्पाचा खर्च आताच २३ हजार ५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.