डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी कठोर कारवाई करा - अशोक चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 04:34 PM2019-05-27T16:34:43+5:302019-05-27T16:35:27+5:30
उच्चशिक्षित लोकांच्या मनातूनही जात जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे.
मुंबई - नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलेल्या सर्वांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, डॉ. पायल नायर हॉस्पिटलमध्ये वैद्यकिय पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिला राखीव जागेवर प्रवेश मिळाला होता. ही बाब तिच्याबरोबर शिक्षण घेत असलेल्या काही सहकारी डॉक्टरांना खूपत होती. आरक्षित जागेवर प्रवेश मिळवला म्हणून पायलला नेहमी जातीवाचक टोमणे मारले जात होते. याबाबत पायलने वारंवार तक्रार देखील केली होती, अशी माहिती आहे. असे असतानाही तिच्या तक्रारीची वेळीच योग्य दखल घेण्यात आलेली नाही. तक्रारीवर वेळीच दखल घेऊन कारवाई केली असती तर कदाचित ही दुःखद घटना टाळता आली असती असं चव्हाणांनी सांगितले.
तसेच डॉ. पायल तडवी आदिवासी समाजाची होती. तिचा जातीवरून मानसिक छळ केला जात होता, या रॅगिंगला कंटाळून तिने आत्महत्या केली. उच्चशिक्षित लोकांच्या मनातूनही जात जात नाही हे अत्यंत निषेधार्ह आहे. समाजात अजूनही जातीच्या भिंती असल्याचे चित्र दुर्दैवी आहे. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले.
नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या रॅगिंगच्या जाचाला कंटाळून पायल तडवी या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी नायर रुग्णालयामध्ये रॅगिंग विरोधी समितीची बैठक घेण्यात आली होती, ती आठ तास चालली. चौकशीनंतर प्रसूती विभागातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिन्ही डॉक्टर फरार असल्याने त्यांचा जबाब नोंदविण्यात आलेला नाही. त्यांच्यावर रॅगिंगचा आरोप आहे.
डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या घटनेत तीन वरिष्ठ डॉक्टरांच्या विरोधात रॅगिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण संचालनालयांतर्गत त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या वतीने प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येईल.
या त्रिसदस्यीय समितीत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, मुंबई महानगरपालिकेच्या महाविद्यालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. हेमंत देशमुख आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसकर यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून हा कायदा अधिक कडक कसा करता येईल याचा अभ्यास तज्ज्ञांच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानुसार रॅगिंगच्या कायद्यात कोणत्या प्रकारच्या दुरुस्त्या करण्यात याव्या याचा अहवाल येत्या आठ दिवसांत सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान पल्लवीने आत्महत्या केली़ बारा तासांनंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी जाणीवपूर्वक ही दिरंगाई केली. संशयित आरोपींपैकी एकाच्या कुटुंबात वकील सदस्य आहे, तर एकाच्या घरात न्यायाधीश आहे. त्याचा फायदा घेत गुन्हा नोंदवण्यास उशीर केला, याचा तपास पारदर्शक होण्यासाठी सीआयडीकडे हे प्रकरण सोपवावे, अशी मागणी अॅड, डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.