एटीएमच्या कॅश डिस्पेन्सरला टेप लावून चौघांच्या पैशांवर डल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 09:51 AM2023-12-10T09:51:31+5:302023-12-10T09:51:45+5:30
चोरांचा नवा फंडा; तीन संशयितांवर गुन्हा दाखल
मुंबई : एटीएम मशीनच्या कॅश डिस्पेन्सर (रोख वितरण) स्लॉटला चिकटपट्टी लावत जवळपास चार जणांचे पैसे काढून घेण्याचा प्रकार कांदिवली पूर्व परिसरात घडला आहे. या विरोधात बँक मॅनेजरने समतानगर पोलिसांत तक्रार दिली आहे. तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांदिवली पूर्वच्या सियारा टॉवरमध्ये युनियन बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये दोन मशीन आहेत. तक्रारदार हिरालाल महतो (३५) हे बँकेच्या कांदिवली पूर्व शाखेचे मॅनेजर आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, ४ डिसेंबर रोजी त्यांना विश्वनाथ सोळंकी तसेच अन्य चार कार्डधारकांनी एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते बाहेर येत नाही, मात्र खात्यामधून पैसे कट झाले आहेत, अशी तक्रार केली. या चौघांचे मिळून एकूण ३२ हजार २०० रुपये भामट्यांकडून काढून घेण्यात आले होते.
या चोरीविराेधात तक्रार दाखल झाल्यानंतर समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि...
महतो यांनी याप्रकरणी चौकशी करण्यासाठी एटीएम सेंटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यात त्यांना अनोळखी तीन जण एटीएममध्ये पैसे जिथून बाहेर येतात त्या स्लॉटला एक चंदेरी रंगाची चिकटपट्टी लावत असल्याचे दिसले.
परिणामी, कार्ड धारकांनी जरी कमांड व्यवस्थित दिली तरी देखील तिथून पैसे बाहेर येणार नाही, अशा प्रकारे त्यांनी तो भाग चिकटवला असल्याचे उघड झाले.
विविध बँकेच्या अनेक ग्राहकांच्या पैशांची चोरी अशाच प्रकारे झाली असल्याची शक्यता वर्तवत तक्रारदार महतो यांनी अनोळखी तीन व्यक्तींच्या विरोधात तक्रार दिली.