टाटा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या, नैराश्येच्या गर्तेत उचलले पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 08:24 PM2018-06-03T20:24:02+5:302018-06-03T20:31:42+5:30
परळ येथील टाटा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
मुंबई : परळ येथील टाटा रुग्णालयात शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. रुपाली कळकुंदरे (३५) असे महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचे नाव असून, तिने ड्युटीवर असताना इंजेक्शनेद्वारे गुंगीच्या औषधांचा ओव्हरडोस घेत स्वत:चे आयुष्य संपविले. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
मूळची कोल्हापूरची असणारी रुपाली ही गेल्या दोन वर्षांपासून टाटा रुग्णालयाच्या भूलतज्ज्ञ विभागात कार्यरत होती. तिचा पतीही याच रुग्णालयात काम करत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. तीन वर्षांपूर्वी रुपालीचे विवाह झाला होता, मात्र ती गेल्या दोन वर्षांपासून नैराश्याच्या गर्तेत असल्याने तिच्यावर उपचार सुरु होते. याच नैराश्यातून शनिवारी सायंकाळी टाटा रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावरच्या विभागात काम करताना आत्महत्या केली. मात्र काही वेळात त्या विभागात पत्नीला भेटण्यास आलेल्या पतीच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर त्वरित तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
Mumbai: A Resident doctor at Tata Memorial Hospital allegedly committed suicide yesterday evening because she was suffering from depression. She died with an overdose of anesthetic injections. Police registered Accidental Death Report (ADR). Investigation underway #Maharashtra
— ANI (@ANI) June 3, 2018
या नैराश्याचे नेमके कारण कळू शकले नाही, मात्र याच मानसिक ताणाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलीसांनी दिली. तिचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा कुटुंबीयांकडे सोपविण्यात आला. तसेच तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समजेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी दिली.