आज ६६ वा जंजिरा मुक्ती दिन
By admin | Published: January 30, 2015 10:36 PM2015-01-30T22:36:25+5:302015-01-30T22:36:25+5:30
ब्रिटिशांच्या जोखडातून भारत देश १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला मात्र त्यापूर्वी येथील क्रांतिवीरांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणपणाने संघर्ष करावा लागला होता
मुरुड : ब्रिटिशांच्या जोखडातून भारत देश १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला मात्र त्यापूर्वी येथील क्रांतिवीरांना स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्राणपणाने संघर्ष करावा लागला होता. ब्रिटिशांची देशावरील सत्ता उलथवून लावण्यासाठी सारेच प्राणपणाने लढले.
हा संग्राम यशस्वी झाला आणि १५ आॅगस्टला भारताचा तिरंगा डौलाने फडकला, मात्र विविध संस्थानच्या संस्थानिकांनी आपल्या ताब्यातील संस्थाने खालसा करण्यास तयारी दाखविली नाही. जंजिऱ्याचे नबाब सिध्दी महमद खान यांनी १४ आॅगस्ट १९४७ रोजी सामीलनाम्यावर स्वाक्षरी केली असली तरी जंजिरा संस्थान ३१ जाने. १९४८ रोजी विलीन केले. मुरुडसह म्हसळा आणि श्रीवर्धन हे स्वतंत्र झाले. त्यामुळे ३१ जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटिशांनी भारत देशावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केले. परचक्रातून भारतमातेला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेकांनी ब्रिटिशांविरुध्द प्राणपणाने झुंज दिली. प्राणांचे बलिदान देऊन हौतात्म्य पत्करले. इंग्रजांना दे माय धरणी ठाय करुन सोडले. क्रांतिवीरांनी बळीवेदीवर प्रार्णापण केले. त्यांना गाशा गुंडाळावा लागला. (वार्ताहर)