आज स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ पाणबुडीचा होणार नौदलात समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 06:01 AM2017-12-14T06:01:18+5:302017-12-14T06:01:50+5:30
माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत ‘कलवरी’ नौदल ताफ्यातील समावेशाचा सोहळा पार पडणार आहे.
मुंबई : माझगाव गोदीत बांधण्यात आलेली स्वदेशी बनावटीची पहिली स्कॉर्पियन ‘कलवरी’ ही पाणबुडी गुरुवारी भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह नौदलाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या उपस्थितीत ‘कलवरी’ नौदल ताफ्यातील समावेशाचा सोहळा पार पडणार आहे.
फ्रान्सच्या ‘डीसीएनएस’ या कंपनीच्या सहकार्याने सहा पाणबुड्या निर्मितीचा प्रकल्प माझगाव गोदीत सुरू आहे. फ्रान्सबरोबर तीन अब्ज डॉलरच्या कराराद्वारे डिझेल-इलेक्ट्रिकवरील पाणबुड्यांची भारतात निर्मिती करण्याचा निर्णय झाला होता. या करारानुसार २०१३ साली पहिली पाणबुडी नौदलात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी तब्बल चार वर्षांच्या विलंबानंतर पहिली पाणबुडी नौदलात दाखल झाली. त्यापैकी कलवरी आणि खंदेरी या दोन पाणबुड्या नौदलाकडे या वर्षी सुपुर्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर, आता तब्बल १२० दिवसांच्या कठोर सागरी परीक्षणानंतर, कलवरी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होण्यास सज्ज झाली आहे, तर खंदेरीच्या सागरी चाचण्या सुरू आहेत. कलवरी पाणबुड्याच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. २०२१ पर्यंत स्कॉर्पियन श्रेणीतील उर्वरित पाणबुड्या नौदलात दाखल होण्याची शक्यता आहे.