मुलांना विष देत विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 07:01 AM2018-04-06T07:01:15+5:302018-04-06T07:01:15+5:30
पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने प्रेमविवाह केला. त्याच्यापासून दोन मुले झाली. मात्र, सासरच्या मंडळींना ते मान्य नव्हते. उठता-बसता टोमणे, मारहाण सुरू झाली. पतीही त्यात सहभागी झाल्याने अत्याचारात भर पडली.
मुंबई - पहिल्या पतीच्या निधनानंतर तिने प्रेमविवाह केला. त्याच्यापासून दोन मुले झाली. मात्र, सासरच्या मंडळींना ते मान्य नव्हते. उठता-बसता टोमणे, मारहाण सुरू झाली. पतीही त्यात सहभागी झाल्याने अत्याचारात भर पडली. अखेर या अत्याचाराला कंटाळलेल्या विवाहितेने स्वत:सह दोन मुलांना संपविण्याचा निर्णय घेतला. कामावरून घरी येताना शीतपेयात उंदीर मारण्याचे औषध मिसळले. तेच शीतपेय स्वत: पित दोन मुलांना पाजल्याची धक्कादायक घटना पवईत घडली. घरी आलेल्या नातेवाइकांना तिघेही बेशुद्धावस्थेत आढळ्याने, त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पवई परिसरात अलका प्रवीण वाघमारे (४३) ही पती, दोन मुले आणि सासूसोबत राहते. ती एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. १९९५ मध्ये तिचा विवेक वैटाळसोबत विवाह झाला. लग्नाच्या तीन वर्षांतच आजाराने वैटाळचा मृत्यू
झाला. अशातच २०११ मध्ये प्रवीणने तिला आधार दिला. तिने त्याच्यासोबत प्रेमविवाह केला. त्याच्यापासून त्यांना अरहंत (४) आणि अर्चिमन (५) ही दोन मुले आहेत. अलकाचा हा प्रेमविवाह सासूला मान्य नव्हता. म्हणून त्यांच्याकडून तिला मानसिक, तसेच शारीरिक छळ सुरू झाला. किरकोळ भांडणातून तिला मारझोड सुरू झाली. रविवारीही सासरच्या मंडळींसोबत तिचा वाद झाला. १ एप्रिल रोजी याच छळाला कंटाळून तिने स्वत:सह मुलांना संपविण्याचा निर्णय घेतला. कामावरून घरी परतत असताना, तिने दुकानातून शीतपेय आणि उंदीर मारण्याचे औषध खरेदी केले. हेच औषध शीतपेयामध्ये मिसळून स्वत: पित दोन्ही चिमुरड्यांना पाजले.
घरी आलेल्या नातेवाइकांना तिघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांनी तिघांनाही रात्री उशिराने विक्रोळीच्या महात्मा फुले रुग्णालयात नेले. तेथून त्यांना सायन रुग्णालयात हलविण्यात आले. सायन रुग्णालयाकडून घटनेची वर्दी लागताच पवई पोलीस तेथे दाखल झाले. महिलेच्या जबाबात वरील घटनाक्रम उघडकीस आला आहे.
ंमहिलेविरुद्धही गुन्हा
पवई पोलिसांनी बुधवारी अलका हिच्याविरुद्ध मुलांचा हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पवई पोलिसांनी दिली.