शताब्दी रुग्णालयात उंदरांनी घेतला दोन महिलांचा चावा, एकीच्या पायाला तर दुसरीच्या डोळ्याला गंभीर दुखापत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 03:00 AM2017-10-10T03:00:49+5:302017-10-10T03:01:11+5:30
महापालिकेच्या रुग्णालयांमधील दुरवस्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उंदरांनी धुडगूस घातला असून
मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांमधील दुरवस्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात उंदरांनी धुडगूस घातला असून, उपचारासाठी गेलेल्या दोन महिला रुग्णांचा चावा घेतला आहे. त्यांच्या पायाला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघींवरही उपचार सुरू आहेत. ११ दिवसांच्या आत या दोन घटना
घडल्या असून, रुग्णांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
शीलाबेन या ८ आॅक्टोबरला उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्याच रात्री त्यांच्या डाव्या पायाचा उंदराने चावा घेतला.
शीलाबेन या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांना मधुमेह आहे. त्यातच उंदराने पायाचाच चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रात्री ही घटना घडली. हा प्रकार सकाळी लक्षात आल्याने तातडीने त्यांच्या पायावर उपचार करण्यात आले. शिवाय, आणखी काही दिवस त्यांना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागतील अशी
माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
दुसरी घटना ३० सप्टेंबरला घडली. प्रमिला नेरुरकर ही महिला २९ सप्टेंबरला शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. दुसºयाच दिवशी त्यांच्या डाव्या डोळ्याचा उंदराने चावा घेतला. दोघींनाही पालिकेने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांकडे आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे.