'उदयनराजेंना साथ द्या'... पहिल्या टप्प्यात साताऱ्यासह 'या' 6 ठिकाणी होणार 'राज'गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 07:55 AM2019-04-08T07:55:12+5:302019-04-08T07:58:07+5:30
राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजापाध्यक्ष अमित शहांविरुद्ध शड्डू ठोकला आहे.
मुंबई - लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण राज्यात 8 ते 10 सभा घेणार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीमनसेच्या पाडवा मेळाव्यात जाहीर केले. राज ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातील सहा सभा कुठे आणि कधी होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र, राज ठाकरेंच्या सभांची उत्सुकता संपली आहे. राज ठाकरे 14 एप्रिलपासून आपल्या प्रचाराची तोफ डागणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात राज यांची पहिली सभा होणार आहे.
राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजापाध्यक्ष अमित शहांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. त्यानुसार, भाजपाचा विरोध करण्यासाठी राज हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा घेत आहेत. राज यांच्या नियोजीत प्रचारसभांचे वेळापत्रक ठरलं असून पहिल्या 6 सभांच्या तारखा आणि ठिकाणं निश्चित झाली आहेत. त्यानुसार खालील ठिकाणी राज यांच्या सभा होणार आहेत. तर उदनयराजे भोसेले यांच्या प्रचारार्थही कराडमध्ये राज यांची सभा होणार आहे. त्यामुळे भाजपाविरुद्धचा राज यांचा प्रचार म्हणजे साताऱ्यात उदयनराजेंना साथ द्या, अशीच राज यांची भूमिका असणार आहे.
विशेष म्हणजे मनसेच्या माध्यमातूनच या सर्व सभांचे आयोजन केले जाणार आहे. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कुठलाही स्थानिक उमेदवार या सभांवेळी व्यासपीठावर नसणार आहे.
14 एप्रिल : नांदेड
15 एप्रिल : सोलापूर
16 एप्रिल : इचलकरंजी (कोल्हापूर)
17 एप्रिल : कराड (सातारा)
18 एप्रिल : खडकवासला (पुणे)
19 एप्रिल : पेण किंवा अलिबाग (रायगड)
राज ठाकरे यांच्या मुंबईतील सभेची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याला काँग्रेस भवनही अपवाद नाही. सभेला झालेली गर्दी तसेच ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर केलेल्या टीकेची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सभेत त्यांनी राज्यभरात 8-10 सभा घेण्याचे जाहीर केले आहे. मावळमध्येही त्यांची सभा होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमिवर उल्हास पवार यांना ठाकरे यांनी पुण्यात सभा घेण्याची मागणी करण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, राज ठाकरे यांनी त्यांची स्वतंत्र भुमिका घेतली आहे. त्यांचे दौरे त्यांनी स्वेच्छेने ठरविले आहेत. ते केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघात सभा घेणार नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या मतदारसंघातही त्यांच्या सभा होतील. त्यामुळे त्यांनी पुण्यातही सभा घेतली तर आनंद होईल. मात्र, पहिल्याच टप्प्यात राज यांची पुण्यात सभा होत आहे. कारण, पुण्यातील मतदान हे 23 एप्रिल रोजी होणार आहे. त्यामुळे 18 एप्रिल रोजी पुण्यात सभा होईल.