धमकावणा-या 'हिजबुल'चेच डोळे काढून घ्यायले हवेत, जम्मू काश्मीरातील BJP-PDPचे सरकार धाडसी ऑपरेशन राबवेल काय? - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 07:44 AM2018-01-09T07:44:51+5:302018-01-09T07:47:02+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून जम्मू काश्मीरमधील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
मुंबई - जम्मू काश्मीरमध्ये पुढील महिन्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत काश्मीरी जनतेने सहभागी होऊ नये, असे दहशतवादी संघटना हिजबुलनं बजावलं आहे. शिवाय, पंचायत निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना तर ‘कायमचे आंधळे’ करण्याची धमकी या संघटनेने दिली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून जम्मू काश्मीरमधील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘हिजबुल मुजाहिदीन’सारख्या अतिरेकी संघटनेने पंचायत निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांच्या डोळ्यात ऑसिड टाकून त्यांना कायमचे आंधळे करण्याची धमकी दिली आहे. अशी धमकी देणाऱ्या हिजबुलचेच डोळे खरे तर सरकारने काढून घ्यायला हवेत. जम्मू-कश्मीरातील भाजप-पीडीपीचे सरकार असे धाडसी ‘ऑपरेशन’ राबवेल काय?, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
जम्मू-कश्मीरातून येणाऱ्या बातम्या देशवासीयांना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. रोजच हिंदुस्थानी जवान, पोलीस अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाल्याच्या बातम्या येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच अतिरेक्यांनी बारामुल्ला जिल्हय़ात शक्तिशाली स्फोट घडवून चार पोलिसांचे प्राण घेतले. त्यापाठोपाठ आता हिजबुल मुजाहिदीन या पाकिस्तानसमर्थक अतिरेकी संघटनेने भयंकर धमकी देऊन सरकारला खुले आव्हानच दिले आहे. जम्मू-कश्मीरात पुढच्या महिन्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांत कश्मिरी जनतेने सहभागी होऊ नये, असे ‘हिजबुल’ने बजावले आहे. एवढेच नव्हे, पंचायत निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना तर ‘कायमचे आंधळे’ करण्याची धमकी या संघटनेने दिली आहे. निवडणुका लढवण्यासाठी जे उमेदवार मैदानात उतरतील त्यांना घरातून फरफटत बाहेर काढू आणि सल्फ्युरिक व हायड्रोक्लोरिक ऑसिड त्यांच्या डोळ्यात ओतून या उमेदवारांना ठार आंधळे करू, असे हिजबुलने जाहीर केले आहे. डोळ्यात ऑसिड टाकल्यानंतर या उमेदवारांची दृष्टी कायमची जाईल आणि ते आपल्या कुटुंबासाठी आयुष्यभराचे ‘ओझे’ बनून राहतील, अशी दर्पोक्तीही हिजबुल मुजाहिदीनने केली आहे. हिजबुलचा कमांडर रियाज नायकू याने ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून केलेली ही दमबाजी व्हायरल झाल्यानंतरही जम्मू-कश्मीरचे सरकार जागचे हलले नाही, हे दुर्दैवच म्हणायला हवे.
हिजबुलने आपल्या सर्वच अतिरेक्यांना उमेदवारांचे डोळे फोडण्याचे हे फर्मान जारी केले आहे. संपूर्ण कश्मीर खोऱ्यात हा भयंकर फतवा सोशल मीडियावरून जोरात फिरवला जात आहे. गेल्या २८ वर्षांपासून आम्ही निवडणुका उधळण्याच्या धमक्या देत आहोत, हत्याकांडे घडवत आहोत, मात्र त्याचा काही उपयोग होत नाही; उलट निवडणूक हिंसाचारात आम्ही ज्यांना मारतो त्यांच्या कुटुंबीयांना सरकार घसघशीत आर्थिक मदत करते आणि सरकारी नोकरीही देते. एखाद्या उमेदवाराची हत्या केली तर सरकारी मदतीमुळे कुटुंबीयांसाठी अशी हत्या म्हणजे वरदानच ठरते. मात्र त्याला ठार मारण्याऐवजी डोळ्यात ऑसिड टाकून आंधळे केले तर त्या उमेदवाराला आणि त्याच्या कुटुंबालाही आयुष्यभराची अद्दल घडेल, असा जहरी युक्तिवाद हिजबुलचा कमांडर या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून करताना दिसतो. हिजबुलची ही धमकी म्हणजे भाजपचे केंद्रीय सरकार आणि जम्मू-कश्मीरातील भाजप-पीडीपी युतीच्या सरकारला दिलेले खुले आव्हान आहे. उमेदवारांच्या डोळ्यांत ऑसिड ओतण्याची भाषा करणे हा देशद्रोहच आहे. अशी विखारी फर्माने काढणाऱ्या अतिरेकी संघटनांच्या संदेशांची देवाण-घेवाण करणे, प्रसार करणे हाही देशद्रोहच आहे. सोशल मीडियावरून हे ‘ऍण्टी सोशल मेसेजेस’ पाठवले जात असताना तेथील भारतीय जनता पक्ष आणि पीडीपीचे सरकार काय करीत आहे? निवडणुकीच्या कामातला कुठलाही अडथळा प्रशासन आणि सरकार खपवून घेत नाही. असे असतानाही जम्मू-कश्मीरातील अतिरेकी संघटना आताच नव्हे, तर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी दमबाजी करतात, निवडणुका उधळून लावण्याच्या खुलेआम धमक्या देतात हे कसे खपवून घेतले जाते? कुठलेही सरकार असो, आपले काही वाकडे करत नाही, असा विश्वास अतिरेकी संघटनांच्या मनात निर्माण झाल्यामुळेच हे घडते आहे.
त्यामुळेच हिजबुल, लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमदसारख्या अतिरेकी संघटना असोत किंवा हुरियत कॉन्फरन्ससारख्या पाकधार्जिण्या संघटना, प्रत्येक वेळी निवडणुका उधळून लावण्याच्या धमक्या देतात. निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याची देशद्रोही आवाहने करतात. अशी फर्माने काढणाऱ्या संघटनांच्या उरात धडकी भरेल अशी धडक कारवाईच कधी होत नाही. ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’च्या प्रयोगातून जम्मू-कश्मीरातील सत्तेत सहभागी झालेल्या भारतीय जनता पक्षाने तरी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यावर धमकीबाज संघटनांना धडा शिकवण्यासाठी दबाव आणायला हवा. नोटाबंदीनंतर देशातील दहशतवाद चुटकीसरशी संपून जाईल असे स्वप्न केंद्रीय सरकारने देशातील जनतेला दाखवले होते. प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. आता तर ‘हिजबुल मुजाहिदीन’सारख्या अतिरेकी संघटनेने पंचायत निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांच्या डोळ्यात ऑसिड टाकून त्यांना आंधळे करण्याची धमकी दिली आहे. अशी धमकी देणाऱ्या हिजबुलचेच डोळे खरे तर सरकारने काढून घ्यायला हवेत. जम्मू-कश्मीरातील भाजप-पीडीपीचे सरकार असे धाडसी ‘ऑपरेशन’ राबवेल काय?