भुजबळांची अटक व तुरुंगवास हा काळाने घेतलेला सूड - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 07:38 AM2018-05-08T07:38:37+5:302018-05-08T07:39:34+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरी टीकास्त्र सोडले आहे.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरी टीकास्त्र सोडले आहे. ''भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा'',अशा बोचऱ्या शब्दांत उद्धव ठाकरेंनी भुजबळांवर टीका केली आहे.
- काय आहे आजचे सामना संपादकीय?
छगन भुजबळ यांना जामीन मिळाला आहे व आता ते तुरुंगातून बाहेर येतील. गेल्या साधारण दोनेक वर्षांपासून भुजबळ तुरुंगात होते व प्रयत्न करूनही त्यांना जामीन मिळत नव्हता. भुजबळांच्या सुटकेचे कायदेशीर आणि न्यायालयीन मार्ग बंद झाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले व आंदोलने केली, पण त्यातूनही काही साध्य झाले नाही. अखेर संपूर्ण पिचलेले व मनाने खचलेले भुजबळ तुरुंगातुन बाहेर आले आहेत व त्यांच्या समर्थकांनी नाशिक, येवला व अन्य भागांत फटाके वगैरे वाजवून जल्लोष केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. भुजबळांची अटक व तुरुंगवास हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड ठरावा. भुजबळ हे राज्याचे गृहमंत्री असताना शिवसेनाप्रमुखांच्या अटकेसाठी त्यांनी जो आटापिटा केला होता त्याचे विस्मरण महाराष्ट्राला झालेले नाही. ‘सामना’तील जुन्या अग्रलेखांचे प्रकरण त्यांनी उकरून काढले व शिवसेनाप्रमुखांना अटक करणारच असा विडा त्यांनी उचलला. पण हे सर्व प्रकरण न्यायालयाने पाच मिनिटांत उडवून लावले. दिल्लीत तेव्हा आमच्या प्रिय मित्रपक्षाचे राज्य होते व शिवसेनाप्रमुखांच्या अटकेनंतर उसळलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तेव्हाच्या दिल्लीवाल्यांनी इतर राज्यांची पोलीस कुमक महाराष्ट्रात पाठवली होती. म्हणजे शिवसेनेच्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपची ‘गुप्त’ युती ही तेव्हापासून आहे. अर्थात हे अटकमटक प्रकरण सरकारवरच उलटले. योगायोग असा की, आज तुरुंगवास भोगणारे भुजबळ ज्या वयाचे आहेत त्यावेळी बाळासाहेबही त्याच वयाचे होते हे इथे खास नमूद करीत आहोत.
हिंदुत्वाचा प्रचार करणारे अग्रलेख लिहिले, भाषणे केली म्हणून तो खटला बाळासाहेबांवर चालवला गेला. त्यांच्यावर आर्थिक गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नव्हते. पण आज भुजबळांच्या सुटकेच्या निमित्ताने आम्हाला हे सर्व आठवत आहे. भुजबळांनी शिवसेना का सोडली हा त्यांचा प्रश्न, पण शिवसेना सोडल्यावर त्यांनी शिवसेनेच्या विरोधात जे केले त्यामुळे ते सगळ्य़ांच्याच मनातून उतरले. भुजबळ शिवसेनेत असते तर त्यांच्यावर अशाप्रकारे तुरुंगात सडण्याची वेळ आली नसती. संकटकाळात जिवास जीव देणारे लोक हीच शिवसेनेची श्रीमंती आहे. भुजबळ भायखळ्याच्या रस्त्यांवर भाजी विकत असत. त्या रस्त्यावरून शिवसेनेने त्यांना मुंबईच्या महापौर निवासात व विधिमंडळात पोहोचवले, पण त्याच विधिमंडळातून ते तुरुंगात पोहोचले. भुजबळांच्या सुटकेने आनंद झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्यक्त केली, पण हा आनंद खरा आहे काय? मुख्य म्हणजे भुजबळ हे मनाने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहिले आहेत काय या प्रश्नांची उत्तरे लगेच मिळणार नाहीत. भुजबळांवर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. राजधानी नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनाच्या बांधकामातील कथित घोटाळा तसेच अन्य कंत्रांटांच्या बदल्यात काळ्य़ा पैशांची कमाई केल्याचा आरोप आहेच. शिवाय मनी लॉण्डरिंगसारखे गुन्हेही सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्यावर नोंदवले आहेत. अशा प्रकारच्या खटल्यांतील नियम व कायदे अत्यंत जाचक आहेत.
तरीही चिदंबरम यांचे पुत्र कार्ती हे अशाच मनी लॉण्डरिंग प्रकरणात तुरुंगात गेले व आठेक दिवसांत जामिनावर बाहेर आले, पण भुजबळ दोन वर्षे तुरुंगात सडत राहिले. कायद्याचा व सत्तेचा वापर राजकीय सूड घेण्यासाठी सर्रास केला जातो. सुरेशदादा जैन यांनाही तीनेक वर्षे तुरुंगात जावे लागले ते एकनाथ खडसे यांच्या हट्टापायी व खडसे यांना अटक झाली नसली तरी दोन वर्षे राजकीय वनवास भोगावा लागला तो स्वकीयांमुळेच. आता खडसे ‘क्लीन चिट’चा आधार घेऊन ‘एसीबी’मधून बाहेर पडले. दुसरीकडे भुजबळ, खडसे यांच्याइतकेच गंभीर आरोप असतानाही कृपाशंकर सिंह हे फडणवीसांच्या राज्यात सहीसलामत सुटले. कायदा हा असा मृदंगाप्रमाणे दोन्ही बाजूंनी वाजवला जातो. भुजबळांच्या बाबतीतही तेच झाले. भुजबळ हे ओबीसींचे नेते आहेत व त्यांच्या सुटकेने ओबीसीच्या थंड पडलेल्या चळवळीस बळ मिळेल असे सांगितले जाते. भुजबळ नवा ‘मेकअप’ करून कोणत्या मंचावर जातात? ती उमेद त्यांच्यात उरली आहे काय? या प्रश्नांची उत्तरे भविष्यातच मिळतील. कालपर्यंत भुजबळांच्या वाऱयाला उभे न राहणारे लोक अचानक फटाके वाजवू लागले, एकमेकांना पेढे भरवू लागले. भुजबळ ‘कैदी’ म्हणून इस्पितळात असताना यापैकी कितीजण त्यांच्या समाचाराला गेले, असे अनेक प्रश्न लोकांच्याही मनात आहेत. भुजबळ शिवसेनेशी व शिवसेनाप्रमुखांशी वाईट वागले. महाराष्ट्र सदन उभारण्यात घोटाळा झाला नसल्याचे सत्य तेव्हा फक्त ‘सामना’नेच छापले. आम्ही व्यक्तिगत वैर ठेवत नाही. भुजबळ सुटले. त्यांच्या कुटुंबीयांना नक्कीच आनंद झाला असेल. भुजबळांनी त्यांच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष द्यायला हवे. ते जामिनावरच सुटले आहेत याचे भान त्यांनी सदैव ठेवायला हवे. सुज्ञांस अधिक काय सांगावे!