राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 07:46 AM2018-11-24T07:46:31+5:302018-11-24T07:47:59+5:30

Ram Mandir : राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Uddhav Thackeray slams modi government and yogi government over ram mandir | राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

राम मंदिर उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला 

Next

मुंबई - राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ''सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले, पण ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे. महाभारत फक्त पाच गावांसाठी झाले, पण अयोध्येतील ‘महाभारत’ हे एका राममंदिरासाठी सुरू आहे'', अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
सामना संपादकीयमधल ठळक मुद्दे 
-  राममंदिराची उशी करून जे झोपले होते त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवसेनेने नक्कीच केले आहे.  
- ‘‘जीवनात ‘राम’ उरला नाही’’ असे जेव्हा म्हणतो तेव्हा हिंदू जनमानसातील ‘राम’ किती महत्त्वाचा हे समजून घेतले पाहिजे. प्रचंड लढ्यानंतरही राममंदिर अद्याप उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे. राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. 
- निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे, ‘‘आधी मंदिर, मग सरकार!’’
- तेव्हा झोपलेल्या कुंभकर्णांनो उठा, आता उठला नाहीत तर कायमचे झोपून जाल.   
- निवडणुका आल्या की, राम आठवतो. मग अयोध्येत राममंदिर  का बांधत नाही? हा सरळ प्रश्न आहे. ‘‘राम की रोटी?’’ असा प्रश्न विचारला जातो. रोटी महत्त्वाची आहेच, पण रामाच्या नावाने सत्ता मिळवली ती ‘रोटी’ देण्यासाठी. 
- प्रत्येक निवडणुकीत राममंदिराचे वचन दिले गेले; पण राममंदिरवाल्यांची सत्ता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात येऊनही राममंदिर काही निर्माण झाले नाही आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या अयोध्येतच वनवासी बनले. हाच सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. 
- रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला. 
- ‘‘शिवसेनेचा अयोध्येशी संबंध काय?’’ असे विचारणार्‍यांनी हा इतिहास समजून घ्यावा. पळून जाणार्‍यांना हिंदू समाज नेता मानत नाही, लढणार्‍यांचाच तो गौरव करतो. बाबरी पाडूनही राममंदिर उभे राहत नाही हा रामाचा आणि हिंदुत्वाचा अपमान आहे. 
- बाबरी ऍक्शन कमिटी हा देशद्रोह आहे व न्यायालयाचे लचांड हे थोतांड आहे. राममंदिराची उभारणी न्यायालय नाही, तर आजचे सरकार करील. कारण रामाच्या नावावर तुम्ही मते मागितली. 
- त्यामुळे 2019 पूर्वी एक अध्यादेश काढा व सरळ राममंदिर उभारणीस सुरुवात करा. अरे, तुमच्या राज्यात वाल्याचे वाल्मीकी होतात, पण राममंदिर होत नाही! सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले, पण ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे. 
- महाभारत फक्त पाच गावांसाठी झाले, पण अयोध्येतील ‘महाभारत’ हे एका राममंदिरासाठी सुरू आहे. धर्मराजाने ज्याप्रमाणे सर्व धर्मचर्चा संपवून विजयासाठी युद्ध केले, त्याप्रमाणे रामभूमीवर राममंदिर या स्वाभाविक सत्यासाठी आपण सगळ्यांनीच विजयाच्या ईर्षेने झुंज देऊया. 
- महाराष्ट्र हा जन्मतःच झुंजार आहे. महाराष्ट्राने अयोध्येपर्यंत रामसेतू उभारला आहे. त्या रामसेतूवरूनच आम्ही अयोध्येकडे निघालो आहोत.
 

 

 

Web Title: Uddhav Thackeray slams modi government and yogi government over ram mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.