आधी कामगारांचा वेतन प्रश्न मार्गी लावा, एसटी गणवेश ‘इव्हेंट’मध्ये दिवाकर रावते यांना उद्धव ठाकरेंच्या कानपिचक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 12:08 AM2018-01-07T00:08:58+5:302018-01-07T00:09:05+5:30
गेल्या वर्षीची दिवाळी बीईएसटी, जीएसटी आणि एसटी या मुद्द्यांवर गाजली. दिवाळीत कामगारांनी संप पुकारला होता. महामंडळाच्या नवीन योजना छान आहेत, पण कामगारांचा वेतन प्रश्न मार्गी लावा, अशा कानपिचक्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांना दिल्या.
मुंबई : गेल्या वर्षीची दिवाळी बीईएसटी, जीएसटी आणि एसटी या मुद्द्यांवर गाजली. दिवाळीत कामगारांनी संप पुकारला होता. महामंडळाच्या नवीन योजना छान आहेत, पण कामगारांचा वेतन प्रश्न मार्गी लावा, अशा कानपिचक्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांना दिल्या. परिवर्तन ही काळाची गरज आहे. एसटी लाल डब्यावरून शिवशाहीवर आणली, तशी शिवशाही महामंडळाच्या कारभारात पण आणा, असा टोलाही उद्धव यांनी रावते यांना लगावला.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे गणवेश वाटप वितरण सोहळ््याचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. सोहळ््याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, मंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि परिवहन आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक उपस्थित होते. या वेळी दिवाकर रावते म्हणाले की, टीका करणे सोपे असते. मात्र, निर्मिती अवघड आहे. कर्मचारीभिमुख योजना सुरू आहेत.
गेल्या ५० वर्षांत राज्याच्या विकासात एसटीचा वाटा महत्त्वाचा आहे. राज्याच्या कानाकोपºयात वृत्तपत्रे पोहोचविण्याचे काम एसटी करते. एसटीचा तोटा कमी करण्यासाठी प्रवासी कराची रक्कम एसटीच्या तिजोरीत कशी येईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले, तर खासगी वातानुकूलित बससोबत स्पर्धेसाठी महामंडळाने शिवशाही खासगी बसच्या मागे उभी करून ‘जशास तसे’ उत्तर द्यावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी मांडले.
मार्चअखेर सर्वांना गणवेश
राज्यभरातील १ लाख ८४५ कर्मचारी-अधिकारी वर्गाचे गणवेश वाटप मार्च अखेर पूर्ण होईल, अशी माहिती एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांनी दिली.
वेतन प्रकरणी चर्चा सुरू होणार
एसटी कर्मचाºयांचे वेतन मागील सरकारमुळे कमी आहे. सध्या वेतनप्रश्न न्यायालयात आहे. मात्र, कामगार संघटना महामंडळाच्या परिवारातील एक भाग आहे. वेतन प्रश्न मिटविण्याची आमची इच्छा आहे. वेतनासाठी महामंडळ एक पाऊल पुढे येईल, संघटनांनी एक पाऊल मागे घ्यावे, असे झाल्यास पुढील कार्यक्रम हा वेतन कराराचा असेल, असे रावते यांनी सांगितले. यामुळे पुन्हा एकदा वेतन विषयावर महामंडळ आणि संघटना यांच्या चर्चेचे गुºहाळ सुरू होण्याची चिन्हे आहेत.
लाल डबा नव्हे लाल परी
महामंडळाने दापोडी मध्यवर्ती कार्यशाळेत माइल्ड स्टील मजबूत बसची बांधणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. या नवीन बसचा मूळ लाल रंग कायम ठेवून नवीन रंग दिला आहे. मोठ्या खिडक्या, आरामदायी आसन व्यवस्था एरोडायनॅमिक डिझाइन ही बसची वैशिष्ट्ये आहेत. परिणामी, महामंडळातील लालडब्याची जागा लवकरच लालपरी घेईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
...आणि छतच कापडाने झाकले
मुख्यालयातील सोहळ्यात २४ बाय ४८ फुटांचे तीन भव्य रंगमंच एलईडीसह उभारण्यात आले होते. विविध योजनांसाठी चित्रफीत तयार करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, मुंबई सेंट्रलवरील छत खराब झाले आहे. ते दिसून येऊ नये, यासाठी ते पांढºया कपड्याने झाकले होते.
पर्यावरणपूरक स्वच्छतागृह
राज्यातील ६०९ स्थानकांपैकी ५०९ स्थानके वापरात आहे. स्थानकातील स्वच्छतागृहात अस्वच्छता आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. सामाजिक दायित्व निधीचा वापर करण्यात येईल.
एसटी प्रवाशांना कॅशलेस प्रवासासाठी महाराष्ट्र दिनी अर्थात, १ मेपासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात येणार आहे, तसेच राज्यात ३ हजार ५०० मार्गस्थ
निवारे बांधणार, ८० बस स्थानकांचे नूतनीकरण होणार, १ हजार कर्मचाºयांसाठी निवासस्थाने उभारणार, चालक-वाहक विश्रांतीगृहांचा कायापालट अशा घोषणा या वेळी मंत्री दिवाकर रावते यांनी केल्या.