'उद्धव ठाकरेंचं भाषण समजावून सांगा अन् मनसेकडून 151 रुपये बक्षीस मिळवा'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 10:38 AM2018-12-25T10:38:47+5:302018-12-25T10:42:42+5:30
उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील सभेत ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ ‘आला आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता.
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात चंद्रभागेतिरी महाआरती करुन पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा जिवंत केला. येथील भाषणात उद्धव ठाकरेंनी हिंदू, हिंदुत्व, शेतकरी या मुद्द्यांवर भाष्य करताना भाजपावर टीका केली. मात्र, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरेंचं भाषण समजाऊन सांगणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल, असं देशपांडे यांनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंच्या पंढरपुरातील सभेत ‘जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम’ ‘आला आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमला होता. येथील भाषणातही उद्धव ठाकरेंनी अनेक विषयांना स्पर्श करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका केली. तर आगामी निवडणुकांच्या युतीबाबतही त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंचं भाषण समजण्यापलीकडचं असल्याचं म्हटलंय. कारण, युती करायची की नाही हे जनताच ठरवेल. आम्हाला कुठल्याही फॉर्म्युल्यात रस नाही, असे सांगणे हे संभ्रमात टाकण्यासारखे आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ समजावून सांगणाऱ्यास मनसेकडून 151 रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे देशपांडे यांनी म्हटले. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर सोशल मीडियावरही चर्चा रंगली होती.
जागावाटप गेलं खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा- उद्धव ठाकरे
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी पंढरपुरातील सभेत बोलताना शिवसेना-भाजपा 2019च्या लोकसभा आणि विधानसभेच्या जागावाटपावरही भाष्य केलं. युती होणार का, या फालतू चर्चेत मी जात नाही, जागावाटप खड्ड्यात जाऊ देत, आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.