वानरास पुच्छ तीन, हत्तीस दंत सहा!, वित्तमंत्री मुनगंटीवार यांचा विरोधकांना चिमटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 04:39 AM2018-03-15T04:39:48+5:302018-03-15T04:39:48+5:30
‘वानरास पुच्छ तीन, हत्तीस दंत सहा’ असे चुकीचे वाक्य वाचणाऱ्या विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या व आकडेवारीच्या आधारे राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली.
मुंबई : ‘वानरास पुच्छ तीन, हत्तीस दंत सहा’ असे चुकीचे वाक्य वाचणाऱ्या विरोधकांनी चुकीच्या माहितीच्या व आकडेवारीच्या आधारे राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका केली. पण हेच वाक्य त्यांनी ‘वानरास पुच्छ, हत्तीस दंत सहा’ असे योग्य रीतीने वाचले असते तर बरे झाले असते, असा चिमटा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना काढला.
महसुली उत्पन्नात १५ हजार कोटींची तूट असली तरी ती शून्यावर आणण्याचे आपल्या सरकारचे प्रयत्न असल्याचे मुनगंटीवारांनी सांगितले.
२०१८-१९च्या अर्थसंकल्पावर दोन दिवस विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी १५ वर्षे सतत नापास झालेल्या आघाडी सरकारने विकासाबाबत आमच्यावर टीका करणे म्हणजे ७५ टक्के गुण घेऊन पास होत असलेल्या फडणवीस सरकारला नापास विद्यार्थ्याने मार्गदर्शन करण्यासारखे आहे, अशी बोचरी टीकाही केली. विरोधकांनी योग्य टीका केली असती तर त्याचे स्वागतच केले असते. राज्याचा अर्थसंकल्प कसा असावा यासाठी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण सर्वपक्षीय २०० नेत्यांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यात शरद पवार, अशोक चव्हाण हेही होते पण आपल्याला २००पैकी केवळ एकाकडून सूचना आल्या, असे नमूद करून त्यांनी शिवस्मारकाचे २००१पासून भिजत घोंगडे ठेवणाºया आघाडी सरकारची कूर्मगती बघून कासवानेही आत्महत्या केली असती, असा टोला हाणला.
शिवस्मारक हे जगातील सर्वांत उंच असेच असेल पण कशाची उंची किती ठेवायची हे तज्ज्ञ ठरवतील. टेलरकडे गेल्यावर पॅँटची लांबी टेलर ठरवतो की तुम्ही, असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. भाषणाच्या शेवटी त्यांनी विरोधकांना त्यांनी केलेल्या सर्व आरोपांच्या स्पष्टीकरणाची कागदपत्रे देत यातील चुका दाखविण्याचे आव्हान दिले. महसुली तूट रकमेत मोजायची नसते. २००९-१०मध्ये महसुली तुटीची टक्केवारी ९४ टक्के होती ती आता ५५ टक्क्यांवर आणली आहे. सरकारने घेतलेल्या कर्जाचे प्रमाण मर्यादेतच आहे. कर्मचारी वेतनावरील खर्चाची विरोधकांनी दिलेली आकडेवारी चुकीची आहे. भांडवली गुंतवणूक वाढविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.