Vidhan Sabha 2019: पराग शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार, ५०० कोटींचे मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 04:38 AM2019-10-07T04:38:18+5:302019-10-07T04:38:52+5:30
दुसऱ्या व तिस-या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवाराचा मान मुंबईतील उमेदवारांनाच मिळाला आहे.
- जमीर काझी
मुंबई : माजी मंत्री प्रकाश महेता यांच्याऐवजी घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले बांधकाम व्यावसायिक पराग शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी ५००.६२ कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. मात्र अडीच वर्षांपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी दाखविलेल्या संपत्तीपेक्षा ही रक्कम तब्बल १९० कोटींनी कमी आहे. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी ६९० कोटींची मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर केले होते.
दुसऱ्या व तिस-या क्रमांकाच्या श्रीमंत उमेदवाराचा मान मुंबईतील उमेदवारांनाच मिळाला आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष व मलबार हिल मतदारसंघातील उमेदवार मंगल प्रभात लोढा ४४१ कोटींच्या मालमत्तेसह दुसºया तर मानखुर्द -शिवाजीनगर मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी २०९ कोटींच्या संपत्तीसह तिसºया क्रमांकावर आहेत.
शहा आणि कुटुंबीयांची ४२२ कोटींची जंगम मालमत्ता आणि ७८ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्याच्या घाटकोपर, चेंबूरमधील तीन फ्लॅटची किंमत १५ कोटी इतकी आहे. तर ठाण्यातील ५७१० चौरस फुटांच्या बंगल्याची किंमत १५ कोटी असून चेंबूरमधील तीन फ्लॅटची किंमत २५ कोटी आहे. शहा दाम्पत्याच्या नावावर तब्बल २९९ कोटींचे शेअर्स आहेत, तर व्यावसायिक, निवासी, कृषी व बिगरकृषी अशा १० स्थावर मालमत्ता आहेत. महाराष्ट्र व गुजरातमध्ये त्यांच्या नावे शेतजमीन आहे. त्यांच्याकडे २ कोटी ६ लाखांचे दागिने आहेत. शहा यांच्याकडे स्कोडा कार आहे. पत्नी मानसी यांच्या नावे २ कोटी ४७ लाखांची फरारी गाडी तर ३.४५ कोटी रुपयांचे दागिने आहेत.
अडीच वर्षांत त्यांनी ठेवी मोडल्याचे सादर केलेल्या कागदपत्रांतून समोर आले आहे. त्याशिवाय ही गुंतवणूक व अन्य संपत्ती मुलांच्या नावे केली असण्याची शक्यता आहे.