व्हॅलेंटाइन डेचे हटके फंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:11 AM2018-02-06T02:11:56+5:302018-02-06T02:12:32+5:30
काही वर्षांपूर्वी केवळ एका दिवसापुरता मर्यादित असणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ आता मात्र संपूर्ण फेब्रुवारी महिना साजरा करतात.
मुंबई : काही वर्षांपूर्वी केवळ एका दिवसापुरता मर्यादित असणारा ‘व्हॅलेंटाइन डे’ आता मात्र संपूर्ण फेब्रुवारी महिना साजरा करतात. अगदी उत्साहात सगळ्याच ठिकाणी याची आॅनलाइन- आॅफलाइन जोरदार तयारी सुरू आहे. आताच्या युथ जनरेशनच्या व्हॅलेंटाइन विषयीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत.
पूर्वी व्हॅलेंटाइन म्हटलं की, ‘त्या’ दिवसापुरतं व्यक्त होणं यात वेगळी गंमत होती. परंतु, आता ‘रोझ डे’पासून सुरू होणारा सिलसिला अगदी थेट ‘ब्रेकअप डे’चं सेलिब्रेशन करून संपतो. या फुल्ली एक्साइटेड प्रेमाच्या दिवसाचा भलताच ‘फिव्हर’ सध्या सर्वत्र दिसून येतोय. या दिवसासाठी प्रेमी जोडप्यांच्या तयारीला आता जोर आला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या दिवसाला सगळ्यांत ‘हटके’ गिफ्ट आपण आपल्या प्रियकर-प्रेयसीला देणार हा एकच विचार मनात करून यंगस्टर्स मंडळी वेगवेगळी शक्कल लढवत असतात.
तुम्हीही यंदाचा व्हॅलेंटाइन स्पेशल करू शकता, तुमचा हा दिवस ‘स्पेशल’ बनविण्याचे हे काही खास फंडे...
डीनर, लंच ‘डेट’ : ‘व्हॅलेंटाइन’च्या दिवशी एखादी मस्त डीनर किंवा लंच डेट प्लान करा. शहराबाहेर एखाद्या शांत ठिकाणीही ही डेट प्लान करता येईल. त्या वेळी मस्तपैकी ‘त्या’ व्यक्तीच्या आवडीचं फूड, गिफ्ट प्लान करा. संगीताची आवड
असेल तर छान गाणं गाऊन किंवा गिटारची तार छेडून आपल्या हृदयातील भावना व्यक्त करा.
भटकंती करा
शहराच्या कलकलाटापासून दूर तुम्ही एखादी लाँग ड्राईव्ह अरेंज करू शकता. हा, पण लाँग ड्राईव्हला जाताना असा पर्याय निवडा जिथे तुम्ही यापूर्वी कधीच गेला नसाल. दोघांनी मिळून शहराच्या धकाधकीच्या जीवनापासून दूर जाऊन एखादे छान ठिकाण एक्सप्लोअर करा. त्यामुळे तेथील संस्कृती, लोक, राहणीमान याचा वेध घेता घेता एकमेकांचे मन समजून घेण्यासही मदत होईल. याच भटकंतीच्या प्लानसाठी एकत्र मिळून सायकलिंग करणे हा पर्यायही अवलंबिता येईल. शिवाय, बºयाच जणांना अथांग समुद्रकिनारी, चांदण्यांच्या प्रकाशातही प्रेमभावना व्यक्त करता येईल.
व्हर्च्युअल सेलिब्रेशन
या प्रेमाच्या दिवसाचे सेलिब्रेशन सोशल नेटवर्किंग साइट्सवर होताना दिसेल. म्हणजे, आता फेसबुक, ट्विटर अशा साइट्ससाठी खास फोटोशूट करून ‘व्हर्च्युअल’ जगाला आपल्या प्रेमाची कबुली देण्याचा नवा मंत्रा तरुणाई अवलंबताना दिसतेय. त्यामुळे या प्रेमात सोशल नेटवर्किंग साइट्सचाही खूप मोठा वाटा आहे.
‘टॅटू’ व्यक्त करेल तुमचे प्रेम
टॅटूचा ट्रेंड भलताच लोकप्रिय झाला आहे. अशावेळी व्हॅलेंटाइन डेचे औचित्य साधून आपल्या प्रियकरासाठी खास गोंदवून घेतले जाते. त्यातही काही अशा नक्षींचा समावेश असतो, ज्याचा अर्धा भाग मुलाच्या हातावर तर अर्धा मुलीच्या. दोन्ही हात एकत्र आल्यावर ते चित्र पूर्ण होते. अशा प्रकारचे टॅटू सध्या बाजारात काढून मिळतात. यामध्ये कायम स्वरूपाचे आणि तात्पुरते असे दोन प्रकार आहेत.
हँड मेड गिफ्ट
व्हॅलेंटाइन डेला बाजार वेगवेगळ्या भेटवस्तूंनी रंगिबेरंगी फुलांनी, ग्रिटिंग कार्डने फुलून गेलेला असतो. पण विकत घेऊन एखादे गिफ्ट देण्यात जी मज्जा नाही ती मज्जा स्वत:च्या हाताने तयार केलेल्या गिफ्टमध्ये असते. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या हाताने एखादी भेटवस्तू तयार करून तिला देऊ शकता. याव्यक्तिरिक्तही अनेक छोट्यामोठ्या
कल्पना वापरून हा दिवस तुम्ही स्पेशल बनवू शकता.
कपल टीशर्ट्सचा ट्रेंड : व्हॅलेंटाइनचा दिवस आणखी स्पेशल बनविण्यासाठी हल्ली क्रॉफर्डमार्केट, दादर, वांद्रे, मुलुंड, बोरीवली, मालाड अशा सर्व बाजारपेठांत तसेच आॅनलाइन मार्केट्सवर ‘कपल टीशर्ट्स’चा ट्रेंड सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय. आपण दोन नसून आपण एकच आहोत हे दर्शविण्यासाठी खास टी-शटर््सना प्राधान्य दिले जात आहे. प्रेमी जोडपी एकाच रंगाचे टी-शर्ट घालणे पसंत करू लागली आहेत. त्यावर विविध प्रकारचे संदेश किंवा चित्रे असतात. त्याचबरोबर काही टी-शटर््सवर एकमेकांना संबोधून लिहिलेल्या काही वाक्यांचाही वापर केलेला असतो. सध्या अशा प्रकारची टी-शर्ट खास तयार करून देतात.
म्युझिकल व्हॅलेंटाइन
नव्वदीच्या काळातील सगळ्याच गाण्यांची भुरळ सर्वांच्याच मनावर आहे. आता मात्र या जुन्या गाण्यांना दिलेल्या नव्या फोडणीने युथ जनरेशन त्या गाण्यांच्या प्रेमात आहे. त्यामुळे यंदाचा व्हॅलेंटाइन म्युझिकल साजरा करायचा असेल तर मस्तपैकी आवडत्या गाण्यांचे कलेक्शन गिफ्ट करू शकता. किंवा मग तो क्षण आणखी स्पेशल करण्यासाठी चार ओळी तुम्हीच गुणगुणू शकता.
‘दो दिल एक जान’ पेंडन्ट्स : पेंडन्ट्स हेसुद्धा आपल्या जोडीदारासाठी किंवा मग आपण प्रेम करणाºया व्यक्तीसाठी ‘परफेक्ट’ गिफ्ट आहे. यंदा यामध्येही खूप प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. दोन नावे एकत्र करून एक सुंदर असे पेंडन्ट तयार करून मिळते. या पेंडन्टच्या प्रकाराला सध्या बाजारात सर्वाधिक मागणी आहे. तसेच ब्रेकेबल पेंडन्ट्सनाही सध्या मागणी आहे. एका पेंडन्टचे दोन भाग होतात व ते एकमेकांना जोडल्यावर पूर्ण होते, अशा प्रकारच्या पेंडन्टनाही तरुणांकडून पसंती दिली जात आहे.