मुंबई विद्यापीठ ना'पास' : ऑनलाइन असेसमेंट कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा - भालचंद्र मुणगेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 02:00 PM2017-10-26T14:00:59+5:302017-10-26T14:16:55+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरुन हटवण्यासाठी राज्यपालांनी अडीच महिन्यांचा कालावधी का घेतला?, असा प्रश्न उपस्थित करत माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या काराभारावर टीका केली आहे.
मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना पदावरुन हटवण्यासाठी राज्यपालांनी अडीच महिन्यांचा कालावधी का घेतला?, असा प्रश्न उपस्थित करत माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या काराभारावर टीका केली आहे. अडीच महिन्यांपूर्वीच कुलगुरू बदलाची प्रक्रिया सुरू व्हायला हवी होती. आतापर्यंत नवे कुलगुरू मिळाले असते. राज्यपालांवर असा कोणता दबाव होता, जेणेकरून त्यांनी निर्णय घ्यायला एवढा उशीर लावला, असा मुद्दाही त्यांनी यावेळी उपस्थित केला.''विद्यापीठाची संपूर्ण विश्वासार्हता धुळीस मिळवली आहे. त्यातून प्रशासनाने काहीही धडा घेतलेला नाही. पुन्हा ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या परीक्षा ऑनलाईन असेसमेंट पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. परीक्षा प्रक्रियेची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे.
कारण हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाले आहे. अद्याप ३ हजार ६०० विद्यार्थ्यांचे निकाल प्रलंबित आहे. तर २४ हजार विद्यार्थ्यांच्या निकालाचे रिव्हँल्युशन शिल्लक आहेत'', असंही यावेळी मुणगेकर यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत मुणगेकर यांनी विद्यापीठाच्या कारभारावर चौफेर टीका केली आहे.
जर मुंबई विद्यापीठाला ऑक्टोबरमधील परीक्षा ऑनलाइन असेसमेंट पद्धतीने घ्यायच्या असतील तर उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे. 45 दिवसांत निकालाची हमी द्यावी, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे.
'दोन विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला'
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मुंबईचा भार टाकून राज्यपाल दोन्ही विद्यापीठांचे भविष्य टांगणीवर लावले आहे, असा आरोपही यावेळी मुणगेकर यांनी केला आहे.
'दोन विद्यापीठांतील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला'
शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंवर मुंबईचा भार टाकून राज्यपाल दोन्ही विद्यापीठांचे भविष्य टांगणीवर लावले आहे, असा आरोपही यावेळी मुणगेकर यांनी केला आहे.
मेरीट ट्रॅकला ब्लॅकलिस्ट करण्याची गरज असल्याचेही यावेळी म्हटले आहे.
विद्यापीठासाठी पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक आणि रजिस्ट्रार यांची निवड करावी. ३ हजार ६०० विद्यार्थ्यांचे पेपर गमावल्यानेच निकाल प्रलंबित असल्याचा संशय मुणगेकर यांनी व्यक्त केला आहे. प्रलंबित निकालांची सद्यपरिस्थिती जाहीर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ऑनलाइन असेसमेंटसाठी किती कंत्राटे आली होती?, स्पर्धात्मक निविदा काढल्या का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
''ऑनलाइन असेसमेंट कंत्राटात कोट्यवधींचा घोटाळा''
406 पैकी 300 परीक्षा झाल्यानंतर या पद्धतीचा वापर करण्याचा हट्ट निलंबित कुलगुरू संजय देशमुख यांनी केला. त्यामुळे या कंत्राटामागे कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप मुणगेकर यांनी केला आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, असेही मुणगेकर यावेळी म्हणालेत.
''आर्थिक गैरव्यवस्थापनाचीही चौकशी व्हावी''
विद्यापीठाकडे कर्मचाऱ्यांना या महिन्याचे वेतन द्यायला पैसे नाहीत. विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवस्थापनाचीही चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, डॉ. संजय देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडणाऱ्या सदस्यांनाही निलंबित करायला हवे, अशी मागणी यावेळी मुणगेकर यांनी केली.
मुंबई विद्यापीठाविरोधात निदर्शनाचा इशारा
विद्यार्थी आणि पालकांना सोबत घेऊन विद्यापीठाविरोधात निदर्शने करण्याचा इशारा मुणगेकर यांनी दिला आहे. राज्यपाल आणि सरकार दोघेही कुलगुरूंइतकेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाला जबाबदार असल्याचंही यावेळी मुणगेकर म्हणालेत.