कोमामध्ये असलेल्या पतीची संपत्ती विकू शकते पत्नी- हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 03:08 PM2019-05-09T15:08:44+5:302019-05-09T15:08:57+5:30
मुंबई उच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे.
मुंबईः मुंबई उच्च न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. 6 वर्षं कोमामध्ये असलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीला न्यायालयानं त्याची उत्तराधिकारी नियुक्त केली आहे. त्यामुळे तिला आता पतीची संपत्ती विकता येणार आहे. महिलेनं मेडिकलचं बिल आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा हवाला देत संपत्तीची उत्तराधिकारी बनवण्याचं अपील केलं होतं. जेणेकरून तिला काही संपत्ती विकता येईल. महिलेच्या अपिलानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार गेल्या महिन्यात नायर हॉस्पिटलच्या डीननं कोमातील व्यक्तीच्या तब्येतीची न्युरोलॉजिकल एक्सपर्ट्सच्या टीमकडून तपासणी केली होती. त्यानंतर न्यायालयात याचा रिपोर्टही सादर करण्यात आला.
रिपोर्टनुसार, त्या व्यक्तीचा मेंदू निष्क्रिय स्थितीत आहे. त्यांना 24 तास निगराणीखाली ठेवण्याची गरज आहे आणि ते स्वतः काहीही निर्णय घेऊ शकत नाहीत. महिलेनं वकिलाच्या माध्यमातून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे की, पतीच्या नावे दहिसर आणि भाईंदरमध्ये कमर्शिअल प्रॉपर्टी आहे. त्याचबरोबर बँक अकाऊंट्सपण आहे. संपत्ती विकल्यास आम्हाला आर्थिक मदत मिळेल, जेणेकरून पतीच्या उपचारासाठी पैसे मिळतील. तसेच मुलांच्या शिक्षणासाठी ते पैसे उपयोगी पडतील.
न्यायालयानं याचिकेवर सुनावणी करत म्हटलं आहे की, 2013पासून महिलेचा पती अंथरुणाला खिळलेला आहे. त्याची सेवा करण्यासाठी एका वेगळ्या कमऱ्याची गरज आहे. त्यामुळे कुटुंबाला छोट्या घरातून मोठ्या घरात जाण्याची नितांत गरज आहे. तसेच पत्नीला पतीची उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं आहे. तसेच न्यायालयानं नायर रुग्णालयाला डोनेशन देण्याचेही निर्देश दिले आहेत.