२६ नगरसेवकांनी थकविले वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:24 AM2017-11-15T00:24:45+5:302017-11-15T00:25:07+5:30
सर्वसामान्यांनी एक-दोन महिन्याचे बिल थकविल्यास कारवाईचा इशारा दिला जातो. वीज पुरवठा खंडित केला जातो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसामान्यांनी एक-दोन महिन्याचे बिल थकविल्यास कारवाईचा इशारा दिला जातो. वीज पुरवठा खंडित केला जातो. मात्र एसएनडीएलकडे वीज पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या शहर क्षेत्रातील २६ नगरसेवकांनी गेल्या काही महिन्यात वीज बिल भरलेले नाही. परंतु एसएनडीएलकडून या थकबाकीदारांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. थकबाकी वसुलीत वेगवेगळा निकष कसा असा प्रश्न शहरातील सामान्य ग्राहकांना पडला आहे.
काही नगरसेवकांच्या स्वत:च्या तर काहींच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर वीज मीटर आहे. काही जणांकडे एकापेक्षा अधिक मीटर आहेत. यात भाडेकरूंचाही समावेश आहे. वीज बिल न भरल्यास सामान्य ग्राहकांना एसएनडीएलच्या कॉल सेंटरमधून लगेच फोन येतो. वीज पुरवठा खंडित करण्याची तंबी दिली जाते. सर्वसामान्य नागरिक भीतीमुळे तातडीने बिल भरतात. नगरसेवकांकडे मात्र एसएनडीएलकडून दुर्लक्ष केले जाते. थकबाकीदार असूनही राजकीय दबावामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. बिल न भरताही विजेचा सर्रास वापर करतात. अधिकाºयांनीही याला दुजोरा दिला.
थकबाकीदार नगरसेवकांत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपाचे आहेत. यातील सुषमा चौधरी यांच्याकडे २.७ लाखांची थकबाकी आहे. त्यांनी आॅक्टोबर २०१५ पासून वीज बिल भरलेले नाही. मीटर अधिक गतीने फिरत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.
नगरसेवक प्रवीण भिसीकर यांच्याकडे तीन मीटर्स आहेत. ते दोन मीटर्सचे बिल नियमितपणे भरतात मात्र, तिसºया मीटरचे बिल त्यांनी फेब्रुवारी २०१६ पासून भरलेले नाही. त्यांच्याकडे ४५ हजारांची थकबाकी आहे. काँग्रेसचे नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरीही दोन वीजमीटर आहेत. त्यांच्याकडे १ लाख ६२ हजार ५०० रुपयांची थकबाकी आहे. माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांचेही थकबाकीदारांच्या यादीत नाव आहे. परंतु त्यांनी बिल भरल्याची माहिती दिली.
असे आहेत थकबाकीदार नगरसेवक
भाजपाचे नगरसेवक सुषमा चौधरी, भाग्यश्री कानतोडे, विद्या कन्हेरे, जगदीश ग्वालबंशी, दुर्गा हत्तीठेले, प्रवीण भिसीकर, दीपक वाडीभस्मे, दिव्या धुरडे, ज्योती भिसीकर, वंदना यंगटवार, श्रद्धा पाठक, मनोज चाफले, सरिता कावरे, रिता मुळे, स्नेहल बिहारे, कल्पना कुंभलकर, रेखा साकोरे, नरेंद्र (बाल्या) बोरकर, काँग्रेसचे ऋषिकेश (बंटी) शेळके, हरीश ग्वालबंशी, सय्यदा अन्सारी, कमलेश चौधरी तर बसपाचे संजय बुरेवार व ममता सहारे थकबाक ीदार आहेत.