नागपूर जिल्ह्यात १० महिन्यात २९ शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 07:34 PM2018-11-17T19:34:12+5:302018-11-17T19:36:01+5:30
जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २९ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेल्या कळमेश्वर आणि नरखेड तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी गेल्या तीन महिन्यात आत्महत्या केली, हे विशेष.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाय करण्यात येत आहेत. त्यांना जोडधंदा करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कर्जमाफीचा निर्णयही घेण्यात आला आहे. मात्र याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. नापिकीमुळे शेतकरी गंभीर चिंतित झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या जानेवारीपासून आॅक्टोबर महिन्यापर्यंत २९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. यातील १९ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली तर फक्त सहाच प्रकरणे मदतीस प्राप्त ठरविण्यात आली. चार प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रशासनाचे शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविण्यावर विशेष भर असल्याचे दिसते. पात्र प्रकरणातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली आहे. काटोल, कळमेश्वर आणि नरखेड या तीन तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. अलीकडच्या काळात नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.