अकोल्याचे सचिन बुरघाटे यांना ‘मैत्री गौरव पुरस्कार’
By Admin | Published: December 14, 2014 12:42 AM2014-12-14T00:42:34+5:302014-12-14T00:42:34+5:30
१० बाय १० च्या लहानशा खोलीत ज्ञानार्जनाचा यज्ञ प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशाने शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या अकोल्यातील सचिन बुरघाटे यांना नागपुरातील मैत्री परिवार संस्थेतर्फे
नागपूर : १० बाय १० च्या लहानशा खोलीत ज्ञानार्जनाचा यज्ञ प्रज्वलित करून त्याच्या प्रकाशाने शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमान करणाऱ्या अकोल्यातील सचिन बुरघाटे यांना नागपुरातील मैत्री परिवार संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा ‘मैत्री गौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील लाडेगाव हे सचिन बुरघाटे यांचे मूळ गाव. तुटपुुंज्या मिळकतीतून सचिन यांनी शिक्षणाचा गाडा कसातरी पुढे रेटला. अकोटातील शिक्षण आटोपून ते पुण्याला गेले. तेथे एमबीए केले. दरम्यान, काही दिवस एका बँकेत नोकरीही केली. परंतु घरच्या गरिबीमुळे शिक्षण न घेऊ शकणाऱ्या गावाकडच्या मुलांचे चेहरे सतत डोळ्यापुढे हलत राहायचे. अखेर एक दिवस निर्णय घेतला अन् नोकरी सोडून थेट अकोला गाठले. येथे लहानशा खोलीत १३ मुलांना सोबत घेऊन इंग्रजीचे शिकवणी वर्ग सुरू केले.
आज हे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. अॅस्पायर द इन्स्टिट्यूट आॅफ ह्युमन डेव्हलपमेंट ही बुरघाटे यांची संस्था आज लँग्वेज शिकविणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी संस्था म्हणून नावारूपास आली आहे. स्वत: सचिन बुरघाटे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इंग्लिश ट्रेनर म्हणून ओळखले जातात़ दर दिवाळीला ते अनाथ मुलांना सोबत घेऊन हा सण साजरा करतात. अशा या आदर्श शिक्षकाकडून इतरांनाही सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळावी यासाठी मैत्री परिवाराने बुरघाटे यांना या पुरस्काराकरिता निवडले आहे. अरविंद इनामदार यांच्यापासून सुरू झालेल्या या पुरस्काराच्या क्रमात डॉ. अभय बंग-राणी बंग, डॉ. कोल्हे दाम्पत्य, दिग्दर्शक राजदत्त, अभिजित फाळके, सिंधूताई सपकाळ, देवाजी तोफा यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. असा हा मानाचा पुरस्कार सचिन बुरघाटे यांना जाहीर झाला असून, सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. (प्रतिनिधी)