आंबेडकरवादी व कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज

By admin | Published: July 19, 2015 03:09 AM2015-07-19T03:09:26+5:302015-07-19T03:09:26+5:30

देशात आज ‘फॅसिस्टां’चा अधिक बोलबाला आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांमध्येच त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता असून फॅसिस्टांचा मुकाबला करण्यासाठी ...

Ambedkarites and Communists need to come together | आंबेडकरवादी व कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज

आंबेडकरवादी व कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज

Next

नेताजी राजगडकर प्रथम स्मृतिदिन : उपस्थित वक्त्यांचा सूर
नागपूर : देशात आज ‘फॅसिस्टां’चा अधिक बोलबाला आहे. फुले-शाहू-आंबेडकरवादी आणि कम्युनिस्टांमध्येच त्याला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता असून फॅसिस्टांचा मुकाबला करण्यासाठी फुले-शाहू- आंबेडकर आणि कम्युनिस्टांनी एकत्र येण्याची गरज आहे, असा सूर हिंदी मोरभवन येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित वक्त्यांनी काढला.
आदिवासी साहित्य परिषद व समतेसाठी बहुजन संघर्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत नेताजी राजगडकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त हिंदी मोरभवन येथील सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विचारवंत प्रा. या.व. वडस्कर हे अध्यक्षस्थानी होते. तर डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, बहुजन संघर्षचे संपादक नागेश चौधरी, कम्युनिस्ट नेते डॉ. रतिनाथ मिश्रा आणि ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे प्रमुख वक्ते होते.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, नेताजी यांनी राजकारणाला समाजकारणाचे एक माध्यम मानले. त्यामुळेच ते कुठल्याच एका पक्षात अडकून राहू शकले नाही. त्यांनी अनेक पक्षात काम केले असले तरी त्यांची शेवटपर्यंत कम्युनिस्ट विचारांशीच बांधिलकी होती. आदिवासी साहित्याच्या संकल्पनेचे ते जनक होते. नेताजी एक कृतिशील योद्धा होते. त्यांनी अनेक आयुधांचा वापर करून लढा दिला. देशात राज्यघटना संपविण्याचे षड्यंत्र अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु आज खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर व मार्क्सवादी विचारांची गरज आहे.
नागेश चौधरी म्हणाले, जातीव्यवस्था व वर्गव्यवस्था नष्ट झाल्याशिवाय या देशात समता प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यामुळे कम्युनिस्ट व फुले-आंबेडकरवादी यांना एकत्र आणण्यासाठी नेताजी राजगडकरांनी अभियान राबविले होते. आज त्याची अधिक गरज आहे.
डॉ. रतिनाथ मिश्रा म्हणाले, कम्युनिस्ट हे जसे भरकटले तसेच फुले आणि आंबेडकरवादीसुद्धा भरकटले; परंतु आता त्यांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.
शैलेश पांडे यांनी नेताजी राजगडकर यांच्या स्मृतींना उजाळा देत छेट्या छोट्या परिवर्तनातूनच परिवर्तनाची चळवळ पुढे जात राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले.
वडस्कर आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, देशात आज सर्वत्र निराशाचे वातावरण दिसून येत असले तरी आपण प्रचंड आशावादी आहोत. कारण प्रत्येक समाजाची विकासाची एक गती असते. त्या गतीने तो विकास करतो. आज आदिवासी बहुजन समाज शिक्षण घेत असल्याने त्याला आपल्या अधिकारांची अधिक जाणीव आहे. त्यामुळे तो उद्या आपल्या अधिकारांची मागणी करणे आणि त्यानंतर ते हिसकावण्याची क्षमतासुद्धा विकसित करेल, असा विश्वास व्यक्त केला.
अशोक पळवेकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र मरसकोल्हे यांनी संचालन केले. चंद्रकांत मुगले, उषाकिरण आत्राम, बाळासाहेब नागदेवते, रमेश गेडाम, प्रभू राजगडकर यांनी स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: Ambedkarites and Communists need to come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.