राज्यातील कलावंत विद्यार्थ्यांना यापुढे मिळणार ‘गुणात्मक’ शाबासकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 10:44 AM2017-12-02T10:44:58+5:302017-12-02T10:46:50+5:30
शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्यातील प्रगतीसाठी व्हावा, याकरिता दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे.
शफी पठाण।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : शास्त्रीय कला, चित्रकला या क्षेत्राची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी खेळाडू विद्यार्थ्यांना दहावी व बारावीच्या परीक्षेमध्ये जसे अतिरिक्त गुण दिले जातात, त्याच धर्तीवर आता शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात कौशल्यप्राप्त विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचा उपयोग भविष्यातील प्रगतीसाठी व्हावा, याकरिता दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतला आहे. मार्च २०१८ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना वाढीव गुण देण्यात येणार आहेत. शास्त्रीय कला तसेच लोककला यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या योजना तसेच उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. शिवाय शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून शास्त्रीय कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंतिम तारीख १५ डिसेंबर
दहावीचा निकाल विहीत कालावधीत लावणे शक्य व्हावे यासाठी शाळांकडून सवलतीचे गुण देण्याबाबतचे प्रस्ताव वेळेत सादर व्हावे याकरिता वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी शाळेकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारिख १५ डिसेंबर आहे. शाळांनी विभागीय मंडळाकडे १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव पाठवायचे आहे.