बालकांच्या विकासासाठी बालसदन सज्ज
By admin | Published: December 28, 2016 03:27 AM2016-12-28T03:27:30+5:302016-12-28T03:27:30+5:30
विदर्भ साहाय्यता समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालग्राम व बालसदनला मुलांची काळजी व संरक्षण या अंतर्गत महिला
महिला व बालविकास विभागाची मान्यता : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवेश
नागपूर : विदर्भ साहाय्यता समितीतर्फे चालविण्यात येणाऱ्या बालग्राम व बालसदनला मुलांची काळजी व संरक्षण या अंतर्गत महिला व बालविकास विभागातर्फे मान्यता मिळाली आहे. त्यामुळे बालसदनचे काम पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी मंगळवारी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विदर्भ साहाय्यता समितीच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बालसदन व बालग्रामला नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे दैनदिन कामांमध्ये अडचणी निर्माण होत होत्या. तसेच बालसंगोपन व अनाथ मुलांच्या संगोपनासाठी कार्य करण्यावर बंधने आली होती. विभागीय आयुक्तांनी बालसदनच्या नोंदणीसाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे बालसंगोपन पूर्ण क्षमतेने करणे यापुढे सुलभ होणार आहे.
विदर्भ साहाय्यता समितीचे काटोल रोड येथील बालसदन सुरू व्हावे यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी बालसदन बचाव समिती गठित केली होती. सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, अॅड. विनोद जयस्वाल, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रशांत पवार आदींनी विभागीय आयुक्तांना भेटून बालसदन सुरू करण्याबाबत निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने महिला व बालविकास विभागातर्फे नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्याची कार्यवाही विदर्भ साहाय्यता समितीचे सरकार्यवाह व महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली.
विदर्भ साहाय्यता समितीच्या कार्यकारिणी बैठकीत महिला व बालकल्याण विभाग पुणे यांचेकडून नोंदणी प्रमाणपत्र करून घेतल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. तसेच शैक्षणिक वर्ष २०१६-१७ साठी विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया करण्यासाठी मान्यता देण्यात आली. संस्थेच्या परिसरात वसतिगृहाचे बांधकाम, बहुउद्देशीय सभागृह चालविणे, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या शिक्षणासाठी प्रवेश देणे, तसेच बालसंगोपन व अनाथ मुलांसाठी शैक्षणिक व बौध्दिक उपक्रम राबविण्यास ही या बैठकीत मान्यता देण्यात आली.(प्रतिनिधी)