बडोदा संमेलनापूर्वी ‘अभिजात’बाबत कृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 03:47 PM2018-02-02T15:47:27+5:302018-02-02T15:49:19+5:30
बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बडोदा येथे प्रस्तावित ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वी सर्व मराठी आमदार-खासदारांनी एकत्र येऊन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष वेळ देऊन मराठी भाषेच्या अभिजात दर्जाच्या विषय मार्गी लावावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतल्यास व पंतप्रधानांनी अविलंब मराठीला अभिजात दर्जा दिल्यास केंद्र व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव आम्हाला येत्या साहित्य संमेलनात मांडता येईल, असेही जोशींनी या पत्रात नमूद केले आहे. विनंत्या, आर्जव खूपदा करून झालेत. परंतु अद्याप काही या विषयावर तोडगा निघाला नाही. मागच्या वर्षी डोंबिवलीत पार पडलेल्या संमेलनातही मुख्यमंत्र्यांसमोर ही मागणी करण्यात आली होती. परंतु वर्ष लोटले पुढे काहीच झाले नाही. यंदाचे संमेलन पंतप्रधानांच्या गृहराज्यात होत आहे. हा योग साधून केंद्राने मराठीला अभिजात दर्जा द्यावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
मराठी विद्यापीठाची घोषणाही होऊ द्या
मराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारच्या अख्त्यारितील आहे. त्यामुळे त्याला विलंब होणे समजून घेता येईल. परंतु मराठी विद्यापीठाचा विषय तर पूर्णपणे राज्य शासनाच्या अधिकारातील आहे. महाराष्ट्रात मराठीची होणारी ही प्रतारणा थांबवून राज्य शासनाने यंदाच्या साहित्य संमेलनापूर्वी मराठी विद्यापीठ निर्मितीची घोषणा करावी, याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे.