नागपुरात भाजपचे दीड ते दोन हजार कार्यकर्ते खोळंबले; रेल्वेगाडी दुपारी २ ला निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:00 PM2018-04-05T14:00:42+5:302018-04-05T14:04:24+5:30
मुंबई येथे भाजपच्या वर्धापनदिन सोहळ्याला जाण्यासाठी खास ठरविलेल्या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत भाजप व रेल्वे प्रशासन यांच्यात निर्माण झालेल्या संभ्रमाचा फटका आज येथील अजनी स्थानकावर जमा झालेल्या दीड दोन हजार कार्यकर्त्यांना बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:
गाडीची निर्धारित वेळ दहाची असल्याचे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले असताना ही गाडी सकाळी सव्वा आठलाच रवाना झाली. कार्यकर्त्यांसाठी गाडीची सोय करून ती निघेपर्यंतचा पाच सहा तासांचा काळ या कार्यकर्त्यांना अजनीच्या लहानशा रेल्वेफलाटावरच जिथे जागा मिळेल तिथे बसून काढावा लागतो आहे. यात महिला कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे.
मुंबईच्या कार्यक्रमासाठी प्रत्येक प्रभागातून किमान १००० कार्यकर्ते आणावेत अशी सूचना दिली गेली असल्याने नागपुरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते मुंबईकडे निघण्यास सज्ज झाले होते. मात्र गाडीच्या वेळेतील घोटाळ््यामुळे त्यांना गुरुवारचा अर्धा दिवस अजनीच्या रेल्वे फलाटावरच तिष्ठत बसून काढावा लागतो आहे. यातील काहींनी घरून आणलेले डबे सोडून जेवणे सुरू केली तर काहींनी जवळपासच्या लहानशा हॉटेल्सचा पेटपुजेसाठी आश्रय घेतला. यात काही कार्यकर्ते नागपूरच्या ग्रामीण भागातूनही आलेले आहेत. त्यांचेही यात हाल होत आहेत.
समन्वयाच्या अभावाने अशी झाली गडबड...
भाजपाने मुंबईसाठी आयआरसीटीसी कडे नागपूर-मुंबई अशी गाडी बुक केली होती. तिची नागपूरहून सुटण्याची वेळ सकाळी ७.५० ची निश्चित करण्यात आली होती. मात्र कार्यकर्त्यांना निरोप देताना भाजपने ती वेळ चुकून १० अशी सांगितल्याने ही गाडी सकाळी उत्साहाने स्टेशनवर लवकर आलेल्या थोड्याफार कार्यकर्त्यांना घेऊन रवाना झाली. गाडी निघाल्याने भाजपा कार्यकर्त्यांत गोंधळ उडाला.
या गोंधळाला सोडवण्यासाठी मग रेल्वे प्रशासनाने जी गाडी दुपारी १२ वाजता वर्ध्याहून निघणार होती ती वर्ध्याऐवजी नागपूरहून निघत असल्याचे जाहीर केले. भाजपने जाहीर केलेल्या पत्रकात नागपुरातून ५ हजार कार्यकर्ते घेऊन जाणारी गाडी सकाळी १० वाजता अजनी रेल्वे स्थानकावरून निघेल असे नमूद केले आहे. प्रत्यक्षात मात्र या रेल्वेची वेळ ही ७.५० अशी होती. रेल्वे प्रशासनाने नियोजित वेळेनुसार ती रेल्वे मुंबईकडे मार्गस्थ केली. यावेळी भाजपचे केवळ ३० कार्यकर्ते स्थानकात हजर होते.