सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे नागपुरात चोरट्या तरुणीचे घुमजाव; दुकानदाराची मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:09 PM2018-11-22T13:09:40+5:302018-11-22T13:10:02+5:30
ती आली.. तिने इकडे तिकडे पाहिले.. चोरी केली आणि निघता निघता तिची नजर सीसीटीव्ही कॅमेºयाकडे गेली.. परत फिरून तिने तात्काळ चोरीचा माल परत दुकानात ठेवला आणि सुंबाल्या ठोकल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: ती आली.. तिने इकडे तिकडे पाहिले.. चोरी केली आणि निघता निघता तिची नजर सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे गेली.. परत फिरून तिने तात्काळ चोरीचा माल परत दुकानात ठेवला आणि सुंबाल्या ठोकल्या. मात्र तिचे नशीब खराब होते. लगतच्या दुसऱ्या दुकानात चोरी करताना ती रंगेहात पकडली गेली आणि तिला दुकानादारांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
एखाद्या चित्रपटात घडावी असा किस्सा नागपुरात बुधवारी संध्याकाळी जरीपटका या मोठ्या मार्केटमध्ये घडला. संध्याकाळी बाजार गर्दीने ओसंडून वाहत असताना, एक तरुणी कपड्यांच्या दुकानात शिरली. सोबत आणलेल्या पिशवीत तिने काऊंटरवरची एक लेगिन्स टाकली आणि ती परत फिरली. मात्र नकळत तिची नजर दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर गेली आणि तिचे धाबे दणाणले. गेल्या पावली दुकानात परत येऊन तिने पिशवीतली लेगिन्स शिताफीने परत काऊंटरवर जशीच्या तशी ठेवून दिली. तिची ही हातचलाखी या दुकानात तर खपून गेली. पण शेजारच्या दुकानात जाऊन तिने पुन्हा चोरी केली. तो क्षण मात्र तेथील दुकानदाराने हेरला आणि तिला पकडून मारहाण केली.
तोंड दाखव तुझं असं म्हणत केली मारहाण
दुकानदाराने पकडताच या तरुणीने आपला चेहरा केसांनी झाकून घेतला. मात्र दुकानातील अन्य पुरुष कर्मचाऱ्यांनी तिचे दोन्ही हात पकडून तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला सारत तिचे मोबाईलवर चित्रीकरण केले. एवढेच नव्हे तर या चित्रफितीत हे कर्मचारी तिला मारहाण करतानाही दिसत आहेत. मात्र या प्रकरणाची दुकानदार आणि ती तरुणी या दोघांनीही पोलिसांत तक्रार नोंदवलेली नव्हती.