‘सेरेब्रल पाल्सी’ वाढतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 12:47 AM2017-10-03T00:47:16+5:302017-10-03T00:49:20+5:30
गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गर्भधारणेच्या कालावधीत आईला काही इन्फेक्शन झाल्यास, रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, वेळे आधीच प्रसूती झाल्यास, फार कमी वजनाचे बाळ असल्यास व इतरही काही कारणांमुळे जन्माला येणारे बाळ हे ‘सेरेब्रल पाल्सी’ (गतीमंद) राहू शकते. विशेष म्हणजे, अलीकडे अयोग्य जीवनशैलीमुळे ही लक्षणे बºयाच महिलांमध्ये दिसून येऊ लागली आहे. मात्र या रुग्णांची कुठेही नोंद घेतली जात नसल्याने ‘सेरेब्रल पाल्सी’ वाढत आहे किंवा नाही हा प्रश्न आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
३ आॅक्टोबर हा दिवस ‘राष्टÑीय सेरेब्रल पाल्सी दिन’ म्हणून पाळला जातो. यासंदर्भात रविवारी ‘नागपूर पेडियाट्रिक थेरेपीस्ट असोसिएशन’ने रविवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी रुग्ण वाढल्याचे कबूल केले. पत्रपरिषदेत, डॉ. भाग्यश्री हजारे, डॉ. निलम शर्मा, डॉ. अल्पना मुळे, डॉ. तेजल तुराळे, डॉ. प्रेरणा वाहने, डॉ. पल्लवी भाईक, डॉ. अश्विनी हजारे, डॉ. रेणुका नाईक व डॉ. राखी यांनीही सेलेब्रर पाल्सीशी निगडित विषयांवर प्रकाश टाकला.
ही एक मेंदूची स्थिती
डॉ. मीनाक्षी वानखेडे या म्हणाल्या, ही एक मेंदूची स्थिती आहे. हा रोग नाही. यामध्ये शरीराचा काही भाग किंवा संपूर्ण शरीराच्या हालचालीमध्ये संतुलन किंवा सुसूत्रता नसते. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जारी केलेल्या आकडेवारीनुसार ‘सेरेब्रल पाल्सी’चे (सीपी) हजारात तीन मुले दिसतात. भारतात २५ लाख नागरिक सेरेब्रल पाल्सीने पीडित आहे. शासनाने सेरेब्रल पाल्सीची नोंदणी सुरू केल्यास संशोधनात मदत होईल, असेही त्या म्हणाल्या.
सीपीची कारणे
डॉ. प्राजक्ता ठाकरे म्हणाल्या, बाळ पोटात असताना प्रसूती होईपर्यंत गर्भधारणेच्या काळात आईला काही इन्फेक्शन झाल्यास, आईला रक्तदाब, मधुमेह असल्यास, श्वास घेण्यास किंवा थायरॉईड ग्रंथीचा त्रास असल्यास, प्रसूतीच्या वेळी नाळ बाळाच्या गळ्याभोवती आवळल्यास, खूप कमी वजनाचे बाळ, लवकर न रडणारे बाळ, जन्मानंतर लगेच बाळाला होणारे इन्फेक्शन, डोक्याला मार, कावीळ आदी कारणांमुळे जन्मलेले बाळ ‘सेरेब्रल पाल्सी’ राहूूू शकते.
लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या
डॉ. संपदा लाभे म्हणाल्या, बाळ जन्माला आल्यानंतर अति चिडचिड करीत असेल, फिट्स येत असतील, दूध ओढायला जमत नसेल, शरीरात अति कडकपणा किंवा अति शिथिल असेल, शरीराची एकच बाजू काम करीत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते.
लवकर उपचार फायद्याचे
डॉ. अभिजित देशमुख म्हणाले, सेरेब्रल पाल्सीमध्ये लवकर उपचार सुरू होणे अत्यंत फायदाचे ठरते. कारण बालवयात मेंदूची लवचिकता व शिकण्याची क्षमता फार चांगली असल्यामुळे त्याचा फायदा होतो. या उपचारपद्धतीचे मुख्य उद्दिष्ट हे बहुविकलांग मुलांना स्वावलंबी बनविणे हा असतो. सेरेब्रल पाल्सीसाठी बालरोगतज्ज्ञ, मेंदूरोगतज्ज्ञ, अस्थिरोगतज्ज्ञ, फिजिओथेरॅपिस्ट, अॅक्युपेश्नल थेरॅपिस्ट, सायकोलॉजीस्ट आदींची गरज पडते, असेही ते म्हणाले.