उमरेड पालिका माजी उपाध्यक्षांची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 01:17 PM2022-09-10T13:17:44+5:302022-09-10T13:20:26+5:30
अश्लील संभाषण, पोलिसात गुन्हा दाखल
उमरेड (नागपूर) : पालिकेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा मंत्री डॉ. मुकेश दत्तात्रय मुदगल (५७, रा. कावरापेठ, उमरेड) यांच्यासह अन्य एका महिलेची वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये अश्लील संभाषण असून, डॉ. मुकेश मुदगल यांनी एका विशिष्ट धर्माविषयी अपमानजनक टिप्पणी केल्याची बाब पुढे आली आहे. उमरेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी मुदगल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार महिन्यांपूर्वी महिलेसोबत मोबाइलवरून संभाषणात एका विशिष्ट धर्माविषयी अपमानजनक बोलून इतर धर्मीयांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, असे संभाषण केल्याची बाब तक्रारीत नमूद आहे. कदीर मकबूल शेख (३९, रा. कावरापेठ, उमरेड) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृत्त लिहिस्तोवर डॉ. मुकेश मुदगल यास ताब्यात घेण्यात आले होते. रात्री उशिरा अटक होण्याची संभावना व्यक्त होत आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत खोब्रागडे करीत आहेत.
..हे तर षडयंत्र
हे माझ्या विरोधातील षडयंत्र आहे. तो आवाज माझा नाही. माझ्या विरोधात कटकारस्थान रचले जात असल्याचे डॉ. मुकेश मुदगल यांनी सांगितले. मुदगल यांच्या विरोधात यापूर्वीही उमरेड पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. ते भाजपचे जिल्हा मंत्री असल्याने पक्षस्तरावर कोणती कारवाई होते, याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणी तपास सुरू झाला असून, डॉ. मुकेश मुदगल तसेच महिलेचेही बयाण घेतले जात आहे. एसडीआर, सीडीआर तपासणी केल्यानंतर अधिक बाबींचा उलगडा होईल.
- प्रशांत खोब्रागडे, तपास अधिकारी