तूर खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणीची सोय; पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 07:55 PM2017-12-20T19:55:26+5:302017-12-20T19:55:59+5:30
तुरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : तुरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य डॉ. मिलिंद माने यांनी जालना जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर विक्रीमध्ये झालेल्या गैरप्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला लेखी उत्तर देताना पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, या संदर्भात चंदनझिरा ता. जालना येथील पोलीस ठाण्यात ४९ शेतकरी, १९ व्यापारी व अन्य दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी झालेल्या चर्चेच्या उपप्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री खोत म्हणाले की, यावर्षी तुरीच्या खरेदीसाठी नाफेडमार्फत केंद्र सुरू केले जाणार आहे. त्याचबरोबर खरेदी केंद्रांवर शेतकरी बांधवांना आॅनलाईन नोंदणीदेखील करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुरीमध्ये आर्द्रता बाराच्यावर आल्यास त्यात सवलत देण्याबाबत केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वीरेंद्र जगताप, अनिल कदम यांनी भाग घेतला.
चौकशी करून निर्दोष शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार
या प्रश्नावरील चर्चेत काही निर्दोष शेतकऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. तेव्हा यासंबंधात चौकशी केली जाईल, त्यात शेतकरी निर्दोष आढळून आल्यास त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जातील, असेही राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.