कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडावर आज फैसला

By admin | Published: June 22, 2015 02:55 AM2015-06-22T02:55:31+5:302015-06-22T02:55:31+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडातील अपिलांवर उद्या (सोमवारी) फैसला होणार आहे.

Decision on Kush Katariya and Pintu Shirke killing | कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडावर आज फैसला

कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडावर आज फैसला

Next

हायकोर्ट : उपराजधानीत दहशत पसरविणाऱ्या घटना
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित कुश कटारिया व पिंटू शिर्के हत्याकांडातील अपिलांवर उद्या (सोमवारी) फैसला होणार आहे. न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख हे दुपारी २.३० वाजता निर्णय जाहीर करतील. २२ एप्रिल रोजी पिंटू शिर्के तर, ५ मे रोजी कुश कटारिया हत्याकांडातील अपिलांवर अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती. यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. या दोन्ही घटनांनी उपराजधानीत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अशी आहे प्रकरणांची सद्यस्थिती
कुश कटारिया हत्याकांड
नागपूर सत्र न्यायालयाने कुश कटारिया हत्याकांडातील मुख्य आरोपी आयुष निर्मल पुगलियाला भादंविच्या कलम ३०२(हत्या)अंतर्गत आजन्म सश्रम कारावास, कलम ३६४(अपहरण)अंतर्गत आजन्म सश्रम कारावास आणि कलम २०१ अंतर्गत दोन वर्षे सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. परंतु त्याला कलम ३६४-अ(खंडणीसाठी अपहरण)मधून दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४(अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. या तिन्ही अपिलांवर उच्च न्यायालयात एकत्र सुनावणी झाली. शासनातर्फे विशेष सरकारी वकील राजेंद्र डागा तर, आरोपीतर्फे अ‍ॅड. ए.एम. रिझवी यांनी बाजू मांडली. स्वत:चे दावे सिद्ध करण्यासाठी अ‍ॅड. डागा यांनी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे सुमारे २० निर्णय सादर केले असून, बचाव पक्षातर्फे ६ निर्णय सादर करण्यात आले आहेत.
घटना
११ आॅक्टोबर रोजी दुपारी २ च्या सुमारास कुश हा शुभम बैद व रिद्म पुरिया या दोन मित्रांसोबत घरात खेळत होता. दरम्यान, आरोपी आयुषने चॉकलेटचे आमिष दाखवून कुशला स्वत:कडे बोलावले. कुणालाही दिसू नये म्हणून तो कुश गॅलरीतून खाली उतरतपर्यंत पुढे निघून गेला. कुश त्याच्या मागे धावत आला. यानंतर आयुष कुशला दुचाकीवर बसवून परिसरातून निघून गेला. सायंकाळी ६ च्या सुमारास त्याने खंडणीसाठी कटारियांच्या घरी दूरध्वनी केला. ‘दोन कोटी रुपये द्या अन्यथा कुशला ठार मारेन, पोलिसांना माहिती दिल्यास खबरदार’, अशी धमकी त्याने दिली. कुशचे अपहरण झाल्याचे पुढे आल्यावर गुन्हे शाखा पोलिसांसह संपूर्ण यंत्रणेने कुशचा शोध घेतला, पण काहीच फायदा झाला नाही. कुश आयुषच्या मागे गेला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर आयुषला ताब्यात घेण्यात आले. पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर आयुषने हत्येची कबुली दिली. आयुषने कुशची सूर्यनगरातील एका निर्माणाधीन इमारतीत नेऊन अत्यंत निर्घृण हत्या केली होती. आयुषने आधी कुशच्या डोक्यावर विटेने जोरदार प्रहार केला. कुश रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावर आरोपीने कटरने कुशचा गळा कापला. यानंतर तो कुशचा मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून घटनास्थळावरून निघून गेला.
पिंटू शिर्के हत्याकांड
नागपूर सत्र न्यायालयाने पिंटू शिर्के हत्याकांडातील आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून, सात आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे. विजय किसनराव मते, उमेश संपतराव डहाके, रितेश हिरामणजी गावंडे, किरण उमरावजी कैथे, कमलेश सीताराम निंबर्ते, दिनेश देवीदास गायकी, राजू विठ्ठलराव भद्रे आणि अयुब अमीर खान अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. निर्दोष सुटका झालेल्यांमध्ये मंगेश शिवाजीराव चव्हाण, मयूर ऊर्फ बंटी शिवाजीराव चव्हाण, पांडुरंग मोतीरामजी इंजेवार, राजेश दयारामजी कडू, महेश दामोदर बांते, संदीप नीळकंठराव सणस व मारोती ऊर्फ नव्वा संतोषराव वलके यांचा समावेश आहे. मते, भद्रे व अयुब यांनी स्वतंत्रपणे तर, कैथे व गायकी आणि डहाके, गावंडे व निंबर्ते यांनी मिळून त्यांच्या शिक्षेविरुद्ध उच्च न्यायालयात अपील केले आहे. राज्य शासन व विजया शिर्के यांनी सात आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयाला अपीलद्वारे आव्हान दिले आहे. तसेच विजया शिर्के यांनी जन्मठेप झालेल्या आरोपींच्या शिक्षेत वाढ करण्यासाठी वेगळे अपील दाखल केले आहे. या सर्व आठ अपिलांवर एकत्र सुनावणी झाली.
घटना
१८ जुलै २००१ रोजी विजय मतेवर त्याच्या रघुजीनगर येथील घरी देशीकट्ट्यातून गोळीबार केल्याच्या आरोपाखाली पिंटू शिर्के आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या सहाव्या माळ्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.एम. सईद यांच्यासमक्ष सुनावणी सुरू होती. १९ जून २००२ रोजी सकाळी १०.३० ते १०.४५ वाजताच्या सुमारास पिंटू शिर्के, सहआरोपी सागर जैन, हितेश उके, पप्पू ऊर्फ नरेंद्र मालवीय आणि इतरांना पोलीस संरक्षणात सईद यांच्या न्यायालयात आणण्यात आले होते. पोलीस कॉन्स्टेबल दीपक त्रिवेदी हा पिंटू शिर्के आणि मालवीय यांना घेऊन होता. प्रकरण दुपारी १२.३० ते १ वाजताच्या दरम्यान लागणार असल्याचे न्यायालय लिपिकाने सांगितल्यानंतर पोलिसांनी शिर्के आणि मालवीयला न्यायालयाच्या बाहेर आणले. दरम्यान, विजय मते व त्याच्या १४-१५ साथीदारांनी शिर्केवर गुप्ती, चाकू, कुकरी आणि भाल्याच्या पात्याने हल्ला केला. यानंतर आरोपी पळून गेले. शिर्केचा मेयो रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. त्याच्या देहाची अक्षरश: चाळण करण्यात आली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Decision on Kush Katariya and Pintu Shirke killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.