केंद्रीय राज्यमंत्री हेगडेंविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची आंबेडकरी अनुयायांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 10:09 AM2018-01-04T10:09:15+5:302018-01-04T10:09:55+5:30
कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : कर्नाटकमधील एका कार्यक्रमात राज्यघटना बदलविण्याचे जाहीर वक्तव्य करणारे केंद्रीय कौशल्य व विकास राज्यमंत्री अनंतकुमार दत्तात्रय हेगडे यांच्याविरुद्ध राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीशी संबंधित विविध संस्था, संघटनांमध्ये कार्यरत आंबेडकरी अनुयायांनी सोमवारी सायंकाळी हा तक्रार अर्ज पोलिसांकडे दिला. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्याच्या पुकानूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही राज्यघटना बदलविण्यासाठीच सत्तेत आलो. ती लवकरच बदलू’, असे विधान राज्यमंत्री हेगडे यांनी केल्याचा सदर तक्रारअर्जात आरोप आहे. ठाणेदार रमाकांत दुर्गे यांची भेट घेऊन हा तक्रार अर्ज देताना प्रा. राहुल मून, सुधीर भगत, अॅड. सुरेशचंद्र घाटे, सुखदेव मेश्राम, अमोल कडबे आणि कार्यकर्त्यांनी हेगडेंविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली.
तक्रार वरिष्ठांकडे पाठवू : ठाणेदार
अशी तक्रार आम्हाला मिळाल्याची माहिती ठाणेदार दुर्गे यांनी लोकमतशी बोलताना दिली. पुढील कारवाईसाठी आम्ही ती वरिष्ठांकडे पाठवू, वरिष्ठ त्यावर योग्य तो निर्णय घेतील, असेही दुर्गे लोकमतशी बोलताना म्हणाले.