लोकमत सरपंच अवार्ड्सचे नागपुरात दिमाखदार सोहळ्यात थाटात वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:48 PM2018-02-16T18:48:53+5:302018-02-16T18:50:55+5:30
केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा असलेल्या व गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सरपंचाना लोकमतने नागपुरात एका दिमाखदार सोहळ्यात हृद्य गौरवान्वित केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा असलेल्या व गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सरपंचाना लोकमतने नागपुरात एका दिमाखदार सोहळ्यात हृद्य गौरवान्वित केले. ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या संरपंचाच्या ग्रामपंचायतींना जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येकी १० लाख रुपये देण्यात येतील, अशी घोषणा यावेळी राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी येथे केली. या निधीतून गावात आणखी चांगल्या योजना राबवा, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकमत समुहातर्फे शुक्रवारी गांधीसागर तलाव महाल येथील रजवाडा पॅलेस येथे ‘लोकमत संरपंच अवार्ड’ ची घोषणा व वितरण करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट १३ सरपंच तसेच संपूर्ण वर्गवारीत उत्कृष्ट काम करणाऱ्या एका सरपंचांना ‘सरपंच आॅफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे, अप्पर आयुक्त (महसूल) रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुनिता गावंडे, बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर जुबेर शेख, दीपक बनकोटी, महिंद्रा ट्रॅक्टर्सचे विभागीय महाव्यवस्थापक भालचंद्र माने, आशिष गुप्ता, एरिया मॅनेजर दीपक ललवानी, लक्ष्मणसिंग बलकोटे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, लोकमतचे संपादक दिलीप तिखीले, निवासी संपादक गजानन जानभोर, सहाय्यक उपाध्यक्ष निलेश सिंग आदी उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, थेट सरपंचाकडे गावाची धुरा सोपविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी आता थेट ग्राम पंचायतीला निधी मिळणार आहे. गावांच्या विकासासाठी शासनाने एक हजार योजना आणल्या आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायतींची जबाबदारी वाढणार आहे. नागपूरची जिल्हा नियोजन समिती ही २२० कोटींची होती. अनेक वर्षांपासून त्यात वाढ झाली नाही. आपण ७० लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्याचा भौगोलिक अभ्यास केला. जिल्ह्यातील मानवी निर्देशांकाचे सादरीकरण केले. परिणामी नागपूरची डीपीसी आता ५८५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यातील २०० कोटी रुपये ४० योजनांच्या माध्यमातून थेट ग्राम पंचायतींना देता येऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व आभार लोकमतचे निवासी संपादक गजानन जानभोर यांनी केले. संचालन नेहा जोशी यांनी केले. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, पतंजली आयुर्वेद व महिंद्रा ट्रॅक्टर्सच्या हे सहप्रायोजक आहेत.
ग्रा.प. मधील कामांवर जियो ट्रॅकींगने पाळत
ग्राम पंचायतींना थेट निधी उपलब्ध होणार असल्यामुळे पुढचा काळ हा आधुनिकीकरणाचा राहील. ग्रामपंचायतीमधील प्रत्येक कामांवर जियो ट्रॅकींग राहील. केलेल्या प्रत्येक कामाचे फोटो व व्हिडिओ यावर अपलोड करावे लागतील. यामाध्यमातून प्रत्येक कामाचे आॅडीट होईल. भ्रष्टाचाराला वाव राहणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. ग्रामीण भागाचे शहरीकरण करण्याची शासनाची योजना आहे. त्यासाठी गावाला १९ घटकांवर काम करावे लागेल. गावाला लागणारी वीज गावातच तयार व्हावी, गावातील पाणी गावातच अडवण्यात यावे, सौर ऊर्जेचा वापर व्हावा अशा अनेक गोष्टी आता ग्रामपंचायतींना कराव्या लागणार आहेत. चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ पाणी आणि स्वच्छ परिसर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. परंतु गावामधून डास नष्ट करण्याचे काम सरपंचाचे आहे. त्यासाठी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
गावाबद्दल आत्मियता हवी : आ. सुधीर पारवे
पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांनी पंचायत राज समितीवर प्रकाश टाकला. शासनाच्या चांगल्या योजना आहेत. परंतु त्या गावपातळीवर राबविताना ९० टक्के ठिकाणी त्या फेल ठरतात. कारण निवडून येणारे पदाधिकाऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये आपल्या गावांबद्दल जी आत्मियता असायला हवी ती दिसून येत नाही. गावांबद्दल आपले काही दायित्व आहे, ही भावना निवडून आलेल्यांनी ठेवावी. पंचायतराजच्या माध्यमाचा सरपंचांनी पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुरस्काराने सरपंचांना प्रोत्साहन : सुनिता गावंडे
सुनिता गांवडे म्हणाल्या आपण काम करीत असतो. त्या कामाचे कौतुक व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. लोकमतने यासाठी पुढाकर घेत सरपंचांचा गौरव केला हे कौतुकास्तपद आहे. यातून सरपंचांना गावाचा विकास करण्याची प्रेरणा मिळेल. त्यांचा उत्साह वाढेल. गावाच्या विकासात आता ’मृदा संधारण’ ही सुद्धा काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्राम पंचायती बदलू शकतात गावाचे भकास चित्र : विजय दर्डा
विदेशातील लोकांचा गावातच राहण्यावर भर असतो. येथे मात्र लोक गाव सोडून शहरात येत आहेत. कारण गावांमध्ये रोजगार आणि सोयी सुविधा नाही. त्यामुळे शहरे वाढत असून गावं भकास होत आहेत. शहरात झोपडपट्ट्यांची समस्या वाढत आहे. हे चित्र बदलण्याची क्षमता ग्राम पंचायतीमध्ये आहे, असा विश्वास लोकमतच्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.
दर्डा म्हणाले, राज्य व देशाच्या विकासात ग्राम पंचायतींचे अतिशय महत्त्व आहे. यशवंतराव चव्हाणांपासून तर सुधाकर नाईकांपर्यंत अनेक जणांनी सरपंच पदापासूनच राजकारणाची सुरुवात केली. म्हणूनच जे ग्रामपंचायत चालू शकतात ते देशही चालवू शकतात. ग्रामपंचायत सरपंच चालवतात. त्यामुळे सरपंचाची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे. गावातच रोजगार व सुविधा मिळाल्या, चांगल्या शाळा, शिक्षक, स्वच्छ पाणी, व शौचालय, चांगले रस्ते तयार झाले तर गाव सोडून कुणीही शहरात जाणार नाही. आजचा दिवस लोकमतच्या इतिहासात महत्त्वाचा दिवस आहे. लोकमत अनेक अवॉर्ड, उप्रकम राबवित असतो. परंतु सरपंचांचा सत्कार हा सर्वात महत्वाचा आहे.
गावपातळीवरील उत्कृष्ट कामांचा सत्कार :जुबेर शेख
बीकेटी टायर्सचे एरिया मॅनेजर (अॅग्रीसेल) महाराष्ट्र जुबेर शेख म्हणाले, लोकमत सरपंच अवॉर्ड्स म्हणजे गावतापतळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांचा सत्कार होय. यावेळी त्यांनी बीकेटी टायर्स या कंपनीबाबत माहिती देतांना सांगितले की, ही कंपनी जागतिक स्तरावर कार्य करते. १३० देशांना टायर्स निर्यात करणे. जगातील सर्व प्रकारच्या ट्रॅक्टर्सचे टायर कंपनीतर्फे बनवले जातात. खास महाराष्ट्रातील माती लक्षात घेऊन कमांडर टायर्स तयार केले आहे. हे शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयोगाचे आहे. या टायर्सवर विशेष गॅरंटी सुद्धा देण्यात आलेली आहे. यावेळी त्यांनी एव्हीच्या माध्यमातून कंपनीच्या टायर्सचे महत्त्व पटवून सांगितले.
महिंद्रा ट्रॅक्टर्सचे ‘सरपंचां’शी अटूट नाते : भालचंद्र माने
महिंद्रा ट्रॅक्टर्सचे डीजीएम भालचंद्र माने म्हणाले, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीचे सरपंचांशी एक अतूट असे नाते आहे. महिंद्रा कंपनी ही जगातील एक महत्त्वाची ट्रॅक्टर कंपनी आहे. वर्षाला दीड ते दोन लाख ट्रॅक्टर कंपनीतर्फे विकले जातात. यात भूमीपूत्र, सरपंच इवो व नोवो हे चार प्रमुख कंपनीचे ब्रॅण्ड आहेत. यातही सरपंच नावाचे ट्रॅक्टर हे सर्वाधिक विकले जाते. आता कंपनीतर्फे जिओ हे नवीन ब्रॅण्ड बाजारात आणले जत आहे. कंपनी सामाजिक कार्यातही अग्रेसर असते. महिंद्रा समुद्धी योजनेअंतर्गत विविध सामाजिक प्रकल्प राबवित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
गावाच्या विकासात व संघर्षातही लोकमत आपल्या सोबत
शहरांप्रमाणेच गावांचाही विकास व्हावा, अशी लोकमतची भूमिका राहिली आहे. गावाच्या विकासाशी संबंधित प्रत्येक प्रश्नात, प्रसंगी शासनाशी करावयाच्या संघर्षात लोकमत आपल्या सोबत राहील. गावात राबविण्यात येणारे विविध उपक्रम व विकासाच्या प्रयोगांना लोकमततर्फे प्रसिद्धी दिली जाईल. आपल्या चांगल्या कामाची दखल ते देशासमोर मांडले जाईल, असा शब्द विजय दर्डा यांनी सरपंचांना दिला. या वेळी सरपंचांनी टाळ्यांच्या गजरात दर्डा यांचे स्वागत केले.