प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 12:45 AM2018-04-17T00:45:31+5:302018-04-17T00:45:49+5:30
राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय सण तसेच महत्त्वाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज निर्मिती शासनाच्या १ जानेवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार पायबंद घालण्याच्या त्याचे उत्पादन, वितरण व विक्रेते यांच्यावर संबंधित विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रध्वज कार्यक्रमानंतर मैदानात अथवा रस्त्यावर पडलेले असतात. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. हे टाळण्यासाठी उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर निर्णय देताना प्लास्टिक व कागदी राष्ट्रध्वज वापरावर बंदीचा निर्णय दिला आहे. त्यामुळे येत्या १ मे महाराष्ट्रदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नये, आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यादृष्टीने कार्यक्रम संपल्यानंतर ठिकठिकाणी राष्ट्रध्वज गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. खराब झालेले राष्ट्रध्वज पिशवी किंवा कापडामध्ये व्यवस्थित बांधून सूर्यास्तानंतर वा सूर्योदयापूर्वी जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली नष्ट करण्यात यावे आणि तसे करताना सर्वांनी उभे राहावे व ते पूर्णपणे जाळून नष्ट होईपर्यंत कुणीही जागा सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करण्याकरिता जिल्ह्यातील सामाजिक संघटना, नागरिक, विद्यार्थी यांनी सहकार्य करावे व जमा करण्यात आलेले राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी किंवा संबंधित तहसील कार्यालयात सुपूर्द करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नागरिकांना केले आहे.