नागपुरात मद्यधुंद झायलोचालकाने घेतला पोलिसाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 11:36 PM2018-04-23T23:36:40+5:302018-04-23T23:36:51+5:30
मद्यधुंद झायलोचालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मद्यधुंद झायलोचालकाने जोरदार धडक दिल्यामुळे कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाचा करुण अंत झाला. तर दुसरा पोलीस शिपायी गंभीर जखमी आहे. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री हा भीषण अपघात घडला.
प्रदीप गणपतराव उईके (वय ३४) असे मृताचे तर अजय प्रभाकर पाटील (वय ४२) असे जखमी पोलिसाचे नाव आहे. हे दोघे वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होते. रविवारी त्यांची नाईट ड्युटी होती. रात्री १२.३० च्या सुमारास ते कर्तव्यावर होते. दुचाकीने प्रदीप आणि अजय आठवा मैलकडे गस्त करीत असताना मागून वेगात आलेल्या झायलो (एमएच ३१/ सीएस १८५३) चा आरोपी चालक हर्षदीपसिंग देवेंद्रसिंग आनंद (वय ३६, रा. शिवाजीनगर, हर्षविला, अंबाझरी) याने प्रदीप व अजयच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे खाली पडून दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना डॉक्टरकडे नेले असता डॉक्टरांनी प्रदीप उईके यांना मृत घोषित केले.
आरोपी होता टून्न
कर्तव्यावरील पोलिसाचा बळी घेणारा आरोपी हर्षदीपसिंग आनंद हा दारूच्या नशेत टून्न होता. तो तशाही अवस्थेत बेदरकारपणे कार चालवित होता. त्याचमुळे हा अपघात घडला. दरम्यान, माहिती कळताच वाडी पोलिसांचा ताफा तसेच रात्रपाळीवरील पोलीस अधिकारी अपघातस्थळी तसेच रुग्णालयात पोहचले. आरोपी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, या अपघातामुळे पोलीस दलात तीव्र शोककळा पसरली आहे.