नागपुरात कार्यक्रमप्रसंगी झाला गोंधळ; महेंद्रसिंग धोनी निघून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 15:13 IST2018-11-21T15:07:29+5:302018-11-21T15:13:07+5:30
एम.एस. धोनी अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे नाराज होऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाण्याची घटना नागपुरात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली.

नागपुरात कार्यक्रमप्रसंगी झाला गोंधळ; महेंद्रसिंग धोनी निघून गेला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: एम.एस. धोनी अकादमीच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या गोंधळामुळे नाराज होऊन क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी कार्यक्रम अर्धवट सोडून निघून जाण्याची घटना नागपुरात बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. नागपूरजवळच्या डोंगरगाव येथे गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम बुधवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी धोनी विदर्भातील १२५ क्रिकेटप्रेमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होता. सकाळी धोनीचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच पालक आणि कार्यकर्त्यांनी त्याला पाहण्यासाठी एकच गोंधळ घातला. याबाबत धोनीने आयोजकांकडे नाराजीही व्यक्त केली. या गोंधळाला दूर करीत कसाबसा धोनी व्यासपीठावर पोहचला. कार्यक्रमाला सुरुवातही झाली. दरम्यान धोनीच्या स्वागताला फुले घेऊन उभी असलेल्या लहान लहान शाळकरी मुलांना तेथील बाऊन्सर्सचा धक्का लागून ती खाली पडली. त्यामुळे पालक संतापले. हा प्रकार कळताच आधीच नाराज झालेल्या धोनीने अधिक व्यथित होऊन कार्यक्रमस्थळच सोडले. कार्यक्रमासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांना नंतर स्थानिक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. मात्र धोनीचे मार्गदर्शन न मिळाल्याने विद्यार्थी व त्यांचे पालकही नाराजी व्यक्त करीत होते.
बाऊन्सर्सनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही दोनदा रोखले
या बाऊन्सर्सनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही दोनदा अडवले. यावर या प्रतिनिधींनी आयोजकांकडे आपली नाराजी व्यक्त केली.