मिठाई खा, पण जरा जपून
By admin | Published: October 30, 2016 02:51 AM2016-10-30T02:51:06+5:302016-10-30T02:51:06+5:30
दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी
काळजीपूर्वक खरेदी करा : अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन
नागपूर : दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. तसेच मिठाई निर्मिती करणारे आणि विक्री करणाऱ्यांनी मिठाईची शुद्धता आणि चवीबाबत जागृत राहावे. मुदत संपल्यानंतर मिठाईची विक्री करू नये. कारण ऐन सणाच्या काळात मुदतबाह्य मिठाई खाण्यात आली तर विषबाधा होऊ शकते. नागरिकांनी मिठाई खरेदी करताना मुदतीकडे लक्ष द्यावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केले आहे.
मुदतीनंतरच्या मिठाईने होऊ शकते विषबाधा
दिवाळीत निरनिराळ्या प्रकारची मिठाई खरेदी केली जाते. या काळात आप्तस्वकीयांना भेटकार्ड देताना सणाचा गोडवा अधिक वाढावा यासाठी मिठाई देण्याची प्रथा आहे. या काळात दुग्धजन्य मिठाईची सर्वाधिक खरेदी केली जाते. मुदतीनंतर मिठाई खाण्यात आली तर विषबाधा होऊ शकते. त्यामुळे मिठाई खरेदी करताना नागरिकांनी मुदतीचा आणि संभाव्य विषबाधेचा विचार करावा. मिठाई विकताना उत्पादक कंपनी आणि विक्रेत्यांनीही डब्यावर मुदतीचा उल्लेख करावा. मुदतबाह्य मिठाई विकू नये. कारण दिवाळीचा आनंद साजरा होत असताना मिठाई खाण्यातून विषबाधा होऊ नये. अन्न आणि औषध प्रशासन ठिकठिकाणी तपासणी करीत आहे. पण नागरिकांनी मिठाई खरेदी करताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहरात विषबाधेच्या घटना
दिवाळीत मिठाईमुळे विषबाधा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवाळी सणात अनेक हॉटेलमालक मिठाईचे उत्पादन महिन्यापूर्वीच सुरू करतात. दुग्धजन्य पदार्थांपासून तयार केलेली मिठाई जास्त दिवस टिकत नाही, हे सर्वश्रुत आहे. बहुतांश उत्पादक मिठाईच्या पॅकेजवर मुदत तारखेचा उल्लेख करीत नाहीत. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दिवाळीत शहरातील सर्व रेस्टॉरंटमध्ये मिठाईची तपासणी करणे शक्य नाही, पण जास्तीतजास्त रेस्टॉरंटची तपासणी करण्यात येते. याशिवाय बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या खोव्याचा दर्जा तपासण्यात येत आहे. निकृष्ट असलेला खोवा जप्त करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका रेस्टॉरंटमधून निकृष्ट मिठाई जप्त केली आहे. दिवाळीत विभाग सज्ज असल्याचे अधिकारी म्हणाला.