खाद्यतेलाचा तडका महागला; शेंगदाणा तेल १२०, सोयाबीन ९० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 12:08 PM2019-05-13T12:08:17+5:302019-05-13T12:08:48+5:30
खाद्यान्न, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खाद्यतेलाचे भाव भडकल्यामुळे सर्वसामान्यांना सणासुदीत महागाईचेही चटके बसत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खाद्यान्न, भाजीपाला, पेट्रोल, डिझेल पाठोपाठ खाद्यतेलाचे भाव भडकल्यामुळे सर्वसामान्यांना सणासुदीत महागाईचेही चटके बसत आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या १५ दिवसात शेंगदाणा तेल प्रति किलो १० रुपये आणि सोयाबीन तेल ३ रुपयांनी महाग झाले आहे. भाव वाढल्यामुळे खाद्यतेलाचा तडका महागला आहे. त्यामुळे गृहिणींना स्वयंपाकघरात हात आवरता घ्यावा लागत आहे.
देशात एकूण उत्पादनापैकी शेंगदाणाचे सर्वाधिक उत्पादन अर्थात ७० टक्के गुजरात राज्यात होते. यावर्षी लोकसभेच्या निवडणुकीमुळे गुजरातेतील व्यापाऱ्यांनी भरमसाट वाढ केली आहे. गेल्या १५ दिवसात टीनचे (१५ किलो) दर जवळपास १५० रुपयांनी वाढविले. नागपुरात ठोकमध्ये दर १७५० ते १७७० रुपये आहे. सध्या गुजरातमध्ये चांगल्या प्रतीचे फल्ली तेलाचे टीन १९०० रुपयांत विकण्यात येत आहे. दोन्ही राज्यातील फरक पाहता पुढे टीन ५० ते १०० रुपयांनी महागण्याचे संकेत आहेत. गुजरातेतील व्यापाऱ्यांनी शेंगदाण्याची मोठ्या प्रमाणात साठेबाजी करून दरवाढ केली आहे. नवीन पीक बाजारात येईपर्यंत ग्राहकांना जास्त भावातच खरेदी करावे लागेल, असे मत इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. गेल्यावर्षी गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशात शेंगदाण्याचे पीक सर्वाधिक झाले होते. त्यामुळे गेल्यावर्षी शेंगदाणा तेलाच्या किमतीत फारशी वाढ झाली नव्हती.
लग्नसराईत पाम तेलाची सर्वाधिक मागणी
लग्नसराईत पाम तेलाला मागणी वाढते. आयात महागल्यामुळे पाम तेलाचे भाव वाढले आहे. बाजारात प्रति किलो ८५ रुपये भाव आहेत. पाम तेलाचा उपयोग हॉटेल, कॅटरिंग, सोनपापडी आणि नमकीन तयार करणारे व्यावसायिक सर्वाधिक करतात. पाम तेल मलेशिया आणि इंडोनेशियातून आयात करण्यात येते. देशात या तेलाचा स्वयंपाकघरात उपयोग होत नाही. आता केंद्र सरकारने पामवर आयात शुल्क ४० टक्क्यांपर्यंत वाढविल्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. डॉक्टरांनी कोलेस्ट्रॉल फ्री म्हणून राईस ब्रॅण्ड तेलाला प्राधान्य दिल्यामुळे या तेलाची विक्री आणि भावही वाढले आहेत. सनफ्लॉवर अर्जेंटिनातून आयात होते. शेतकºयांच्या कृषी मालाला चांगला भाव मिळावा, अशी सरकारची इच्छा असल्यामुळे खाद्यतेलाचे भाव पुढेही वाढतील, असे मत इतवारीतील राणी सती एन्टरप्राईजेसचे संचालक अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
दररोज १५ हजार टीनची विक्री
इतवारी बाजारात सोयाबीन तेलाचे ६ ते ७ हजार टीन (प्रति टीन १५ किलो) विक्री होते. त्या तुलनेत शेंगदाणा तेल २ हजार टीन, राईस ब्रॅण्ड एक हजार, सनफ्लॉवर एक हजार, जवस ५००, पाम तेल ३५०० टीन असे एकूण १५ हजार टीनची विक्री होते. याशिवाय तीळ तेलाला मागणी आहे. इतवारी खाद्य तेलाची सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे अनिलकुमार अग्रवाल म्हणाले.
अमेरिकेतून सोयाबीनची आयात
देशात दरवर्षी सोयाबीनच्या पिकापासून जवळपास २५ लाख टन खाद्यतेल निघते. त्यानंतरही देशात खाद्यतेलाचा होणारा उपयोग पाहता आणखी २५ लाख टन खाद्यतेल आयात करावे लागते. सोयाबीनची आयात अमेरिकेच्या शिकागो येथून सर्वाधिक होते. पण क्रूड तेलाचे भाव दरदिवशी वाढत असल्यामुळे सोयाबीनची आयातही महागली आहे. क्रूड तेल महाग असल्यामुळे अमेरिकेत सोयाबीन तेलापासून बायोडिझेल तयार करण्यात येत आहे. परिणामी देशांतर्गत सोयाबीन तेल महागले आहे.
सोयाबीन तेल महाग
दोन महिन्यापूर्वी सोयाबीन तेलाचे दर ८५ रुपये किलो होते. लग्नसराईमुळे त्यात आणखी वाढ झाली. शेंगदाणा तेलाचे दर वाढताच मिलमालकांनी सोयाबीन तेलाचे दर वाढविले. इतवारी बाजारात ९० रुपये किलो आहे. गत हंगामात विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये सोयाबीन पिकाला फटका बसला होता. त्यामुळे सोयाबीन तेलाचे भाव वाढले होते. सोयाबीन तेल विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यात सर्वाधिक विकले जाते. शेंगदाणा आणि सोयाबीन तेलाच्या भावात तब्बल ३० रुपयांचा फरक असल्यामुळे ग्राहकांची सोयाबीन तेलाला जास्त पसंती आहे. दक्षिण भारतात सनफ्लॉवर आणि बिहार व पश्चिम बंगालमध्ये सरसो तेलाची विक्री होते.