नागपूरच्या गंगाजमुनातील धाडसी घरफोडीचा भंडाफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:53 AM2019-01-20T01:53:22+5:302019-01-20T01:54:16+5:30
गंगाजमुनात महिनाभरापूर्वी झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावून आरोपींकडून पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंगाजमुनात महिनाभरापूर्वी झालेल्या धाडसी घरफोडीचा छडा लावून आरोपींकडून पावणेनऊ लाखांचा ऐवज जप्त करण्यात लकडगंज पोलिसांनी यश मिळवले. विकास ऊर्फ सनी राजकुमार वर्मा (वय २८,रा. श्रीकृष्ण अपार्टमेंट, कोतवाली), समीर संजय शेख (वय १९, रा. शास्त्रीनगर, शिवमंदिराजवळ भांडेवाडी), फैजान अन्वर शेख (वय १९), माफिया जब्बार शेख आणि मोनी पतिराम कालखोर (वय २२, रा. तिघेही गंगाजमुना वस्तीजवळ), अशी आरोपींची नावे आहेत. तर, गंगाजमुनातील एक वारांगना आणि तिचा प्रियकर (हद्दपार कुख्यात गुंड सनी) हे या धाडसी घरफोडीचे सूत्रधार आहेत.
गंगाजमुनातील रहिवासी प्रिया गणेश पाटील (वय २९) हिची आजी कलाबाई कालखोर हिचा मृत्यू झाला. त्यामुळे आजीच्या अंत्यसंस्कार आणि पुढच्या कार्यक्रमासाठी प्रिया तिच्या परिवारातील सदस्यांसह १७ डिसेंबर २०१८ ला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जवळच्या बदनापूर, मोतीझिलला गेली होती. २२ डिसेंबरला ती परत आली तेव्हा तिला घराच्या दाराचे कुलूप तुटून दिसले. चोरट्यांनी घरातील २८९ ग्राम सोन्याचे दागिने तसेच सात लाखांची रोकड असा एकूण १२ लाख ७८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. प्रिया पाटीलने या धाडसी घरफोडीची तक्रार लकडगंज ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बहुचर्चित गंगाजमुना परिसरात बाहेरचे गुन्हेगार चोरी-घरफोडी करू शकत नाहीत, असा पोलिसांना विश्वास होता. त्यामुळे या घरफोडीत याच वस्तीतील गुन्हेगार सहभागी असावेत, असा पोलिसांनी कयास बांधला. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. काही दिवसांपूर्वी या भागातील एका वारांगनेजवळ चोरीला गेलेल्या दागिन्यातील ब्रेसलेट असल्याची माहिती पोलिसांना कळाली. त्यावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, वारांगनेने हे ब्रेसलेट तिचा प्रियकर कुख्यात तडीपार गुंड सनी वर्माने दिल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी सनीला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत, या गुन्ह्यात सहभागी असलेले समीर शेख, फैजान शेख, माफिया शेख तसेच मोनी कालखोर यांची नावे सांगितली. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८ लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त केला.
मुंबई, गोव्यात मौजमजा
प्रिया पाटीलच्या घरी तब्बल सात लाखांची रोकड आणि २८९ ग्राम सोने मिळाल्याने आरोपी सनी त्याच्या प्रेयसी आणि साथीदारांसह थेट मुंबईत गेला. तेथे मौजमजा केल्यानंतर त्यांनी गोव्यातही धमाल केली. परत आल्यानंतर सनीने प्रेयसीला दिलेले चोरीतील ब्रेसलेट घालून ती इकडेतिकडे मिरवत होती. हे ब्रेसलेटच या धाडसी घरफोडीचा भंडाफोड करणारे ठरले. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, सहायक आयुक्त वालचंद मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष खांडेकर, उपनिरीक्षक पी. जी. गाडेकर, एएसआय रवी राठोड, हवालदार प्रकाश सिडाम, दीपक कारोकर, अजय बैस, लक्ष्मीकांत गावंडे, नायक राम यादव, वासुदेव जयपूरकर, फिरोज खान, भूषण झाडे आणि शिवराज पाटील यांनी ही कामगिरी बजावली.