शिक्षक भरती प्रक्रियेला मुदतवाढ द्या!
By admin | Published: October 22, 2014 12:58 AM2014-10-22T00:58:54+5:302014-10-22T00:58:54+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक मंगळवारी पार पडली. यात महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काही
नागपूर विद्यापीठ : व्यवस्थापन परिषद सदस्यांची मागणी
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक मंगळवारी पार पडली. यात महाविद्यालयांना शिक्षक भरतीसाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी लावून धरली. रोस्टर तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे ३० आॅक्टोबरपर्यंत मंजूर शिक्षकसंख्येच्या ५० टक्के शिक्षकांची नियुक्ती करणे शक्य नाही, अशी भूमिका यावेळी सदस्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाने ५० टक्के शिक्षक भरतीसंबंधी अध्यादेश काढला होता व ३१ आॅक्टोबरपर्यंत महाविद्यालयांनी शिक्षकभरती करावी, असे निर्देश देण्यात आले होते. परंतु, अद्याप अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षक नियुक्ती रखडली असून मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली. ज्या महाविद्यालयांनी खरोखर प्रयत्न केले आहेत. त्यांची शहनिशा करून त्यांना मुदतवाढ देण्यात यावी, असा मार्ग काढण्यात आला.
विशेष म्हणजे विद्यापीठाच्यावतीने रोस्टर पास केले जात नसल्यामुळे शिक्षक भरतीसाठी अनेक अडचणी निर्माण होतात, असा आवाज विधीसभेच्या बैठकीत काढण्यात आला होता. तसेच, २००२ पासून मरगळलेल्या रोस्टर प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने आतापर्यंत झालेल्या घटनाक्रमाची ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह नोट’ व्यवस्थापन समितीसमोर मांडावी. त्यावर व्यवस्थापन विचार करून निर्णय घेईल असे ठरले. सोबतच ‘फायर इंजिनिअरींग’चा सुधारित अभ्यासक्रम व परीक्षाप्रणालीला मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विधिसभेची बैठक ३० रोजी
दरम्यान, नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ३० आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
मंगळवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत यातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. विधीसभेतील सदस्यांकडून बैठकीसाठी प्रश्न व प्रस्ताव मागविण्यात आले होते. विद्यापीठ प्रशासनाला ३२१ प्रश्न मिळाले. यातील कुठले प्रश्न व प्रस्तावांना बैठकीच्या अजेंड्यात सहभागी करावे यासंदर्भात चर्चा झाली.(प्रतिनिधी)