बीएसएनएलच्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:27 AM2018-02-25T00:27:55+5:302018-02-25T00:28:09+5:30

लाखोंचे बिल थकीत ठेवून युवा अभियंत्याची आर्थिक कोंडी करून त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे बीएसएनएलमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

FIR registered against five accused including BSNL's general manager, devisional engineers | बीएसएनएलच्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

बीएसएनएलच्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next
ठळक मुद्देयुवा अभियंत्याचे आत्महत्या प्रकरण : सर्वत्र खळबळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखोंचे बिल थकीत ठेवून युवा अभियंत्याची आर्थिक कोंडी करून त्यास आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या महाव्यवस्थापक, विभागीय अभियंत्यांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यामुळे बीएसएनएलमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
नम्रता तिवारी (महाव्यवस्थापक, बीएसएनएल), डी. ई. वासनिक (विभागीय अभियंता), अमितकुमार धोटे (दूरसंचार अभियंता), डी. गोडे (आॅप्टीकल फायबर केबल विभाग प्रमुख) आणि ब्रिजेश त्रिपाठी (कंत्राटदार) अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
आनंद दिनेश बाबरिया (वय ३०) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तो गिट्टीखदानमधील हजारी पहाडच्या रचना संयंत्र अपार्टमेंटमध्ये राहत होता. आनंदच्या इन्फ्राटेक प्रा. लि. कंपनीने २०१४ मध्ये बीएसएनएलच्या आॅप्टिकल केबल लाईनच्या कामाचे कंत्राट घेतले होते. मध्येच हे काम बंद करण्याचे त्याला आदेश मिळाले. मात्र, तोपर्यंत त्याने ५० टक्के काम करून ९० लाखांचे बिल दिले होते. वास्तविक २० टक्के काम झाल्यानंतर त्याला चालू (रनिंग) कामाचे बिल देणे बंधनकारक आहे. मात्र, ५० टक्के काम होऊनही अधिकाºयांनी हे बिल देण्यास टाळाटाळ केल्यामुळे आनंदने प्रकरण न्यायालयात नेले. न्यायालयाने त्याला ४२ लाख रुपये एक महिन्याच्या आत देण्याचे आदेश बीएसएनएलला दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशाचाही अधिकाºयांनी मान राखला नाही. मोठी रक्कम अडकून पडल्यानंतर आनंदचा भाऊ अमित पत्नी आणि आईसोबत दिल्लीत राहायला गेला. आनंदसुद्धा दिल्लीत गेला. मात्र, बीएसएनएलकडून रक्कम घ्यायची असल्यामुळे काही दिवसांपूर्वीच तो नागपुरात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांच्या कक्षात तो बिलासाठी चकरा मारत होता आणि अधिकाऱ्यांकडून त्याला टाळण्यासोबतच अपमानास्पद वागणूक मिळत होती. आर्थिक कोंडी झाल्याने तो प्रचंड तणावात आला होता. याच अवस्थेतून त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजता तो आपल्या घरून स्विफ्ट कारने बाहेर पडला. त्याने शून्य माईलजवळ बीएसएनएलच्या कार्यालयालगत आपली कार उभी केली. येथे त्याने विष प्राशन केले. त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे पाहून एकाने सीताबर्डी पोलिसांना कळविले. पोलिसांनी आनंदला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
व्हिडीओतून मिळाला भक्कम पुरावा
आनंदने त्याच्या एमएच ३१. ईए ३५२३ क्रमांकाच्या स्विफ्ट कारमध्ये विष घेण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली. एवढेच नव्हे तर स्वत:च्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ तयार केला. त्यात त्याने आपल्या आत्महत्येला बीएसएनएलचे उपरोक्त अधिकारी जबाबदार असल्याचे नमूद केले. आनंदचे बंधू अमित बाबरिया यांनी हे पुरावे सीताबर्डी पोलिसांकडे देतानाच शुक्रवारी मध्यरात्री उपरोक्त अधिकाºयांविरुद्ध तक्रार नोंदवली. त्याआधारे पोलिसांनी आनंदला मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवून नम्रता तिवारी, डी. ई. वासनिक, अमितकुमार धोटे, डी. गोडे आणि ब्रिजेश त्रिपाठी या पाच जणांविरुद्ध कलम ३०६ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलिसांना कागदपत्रे मिळाली नाही
थकीत बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ करून एका अभियंत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या मृत्यूनंतरही आपली हेकेखोरी कायम ठेवली आहे. पोलिसांनी आनंदच्या कंत्राट आणि बिलासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना कागदपत्रांची मागणी केली. मात्र, शुक्रवारी आणि आज शनिवारीही त्यांनी पोलिसांना कागदपत्रे दिली नाही. दरम्यान,अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे युवा अभियंत्याचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी शनिवारी दुपारी बीएसएनएलच्या कार्यालयात जाऊन निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी अन्य कंत्राटदाराच्या थकीत बिलाबाबत चर्चा करण्यासाठी शिर्षस्थ अधिकाºयांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली. मात्र, अधिकाºयांनी नकार दिल्यामुळे त्यांनी घोषणाबाजी केली. जबरदस्तीने कार्यालयात जाण्याचे प्रयत्न केले. त्याची तक्रार बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दिली तर, या अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणाची तक्रार संबंधित कंत्राटदारांनीही पोलिसांकडे दिली. या दोन्ही तक्रारींची पोलीस चौकशी करीत आहेत.

 

 

Web Title: FIR registered against five accused including BSNL's general manager, devisional engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.