नागपूरनजिकच्या जुनेवानीत पहिल्यांदाच पोहोचली एसटी बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:06 PM2017-11-02T12:06:59+5:302017-11-02T12:18:01+5:30
स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर जुनेवानी गावात बुधवारी (दि. १) पहिल्यांदा एसटी महामंडळाची बस पोहोचली.
आॅनलाईन लोकमत
काटोल : स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७० वर्षांनंतर जुनेवानी गावात बुधवारी (दि. १) पहिल्यांदा एसटी महामंडळाची बस पोहोचली. अतिदुर्गम भाग म्हणून तालुक्यात ओळख असलेल्या जुनेवानी येथील नागरिकांची प्रलंबित मागणी यानिमित्ताने पूर्ण झाली. त्यामुळे गावात बसफेरी पोहोचताच ढोलताशाच्या गजरात बसचे स्वागत केले. खºया अर्थाने ग्रामस्थांनी दिवाळी साजरी केली. बस चालक आणि वाहकाचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
जुनेवानी हे गाव मुख्य रस्त्यापासून आत असल्याने आतापर्यंत या गावात बसफेरी पोहोचलेली नव्हती. ‘गाव तिथे एसटी’ हे एसटी महामंडळाचे ब्रीदवाक्य त्यामुळे फोल ठरले होते. याबाबत नागरिकांनी बºयाचदा काटोल आगाराकडे निवेदन दिले. लोकप्रतिनिधींकडेही निवेदन सोपवित पाठपुरावा केला. परंतु त्याचा काहीएक फायदा होऊ शकला नाही.
गावात बसफेरी नसल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घेत तालुका मुख्यालय गाठावे लागत. दुसरीकडे गावातील विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत होते. साधारणत: ५ किमी पायी जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत. एवढेच काय तर तालुका मुख्यालयी कोणत्याही कामकाजासाठी जायचे असल्यास ५ किमी पायी जावे लागे. ही बाब लक्षात घेत नागरिकांनी अनेकदा निवेदनाच्या माध्यमातून एसटी महामंडळाला साकडे घातले. अखेर नागरिकांच्या मागणीची दखल घेण्यात आली. त्यानुसार बुधवारी जुनेवानी गावात एसटी महामंडळाची बस पोहोचली. काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे यांनी हिरवी झेंडी दाखवून पहिल्या फेरीचे औपचारिक उद्घाटन केले.