दैव बलवत्तर होते म्हणून थोडक्यात टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 08:32 PM2018-04-07T20:32:35+5:302018-04-07T20:46:32+5:30
मुलांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची बातमी कळली, अपघाताचे फोटो व्हायरल झाल्याचे बघितल्यावर अजूनच धक्का बसला. आम्ही तात्काळ शाळेत धाव घेतली. पण मुले सुखरुप होती. कदाचित दैव बलवत्तर होते म्हणून थोडक्यात टळले, अशी भावना धास्तावलेल्या पालकांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलांच्या व्हॅनचा अपघात झाल्याची बातमी कळली, अपघाताचे फोटो व्हायरल झाल्याचे बघितल्यावर अजूनच धक्का बसला. आम्ही तात्काळ शाळेत धाव घेतली. पण मुले सुखरुप होती. कदाचित दैव बलवत्तर होते म्हणून थोडक्यात टळले, अशी भावना धास्तावलेल्या पालकांनी व्यक्त केली. शनिवारी सकाळी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बेसा येथील विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला होता. या अपघातात जखमी झालेला आदी प्रवीण वाघ या विद्यार्थ्यावर सक्करदरा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचबरोबर इतर पाच मुले सुखरुप आहेत.
स्कूलची व्हॅन मुलांना घेऊन शाळेच्या परिसरात पोहचली होती. काही विद्यार्थी व्हॅनमधून उतरले होते तर काही विद्यार्थी उतरायचे होते. मुले आपापल्या स्कूल बॅग काढत असताना, नियंत्रण सुटलेला एक ट्रक उभ्या व्हॅनवर धडकला. परंतु विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून उतरत असल्याने मोठा घातपात झाला नाही. यात स्वस्तिक शुक्ला, आदी वाघ, स्वरुप चन्ने, तनिष पुरी, स्वरा जांगिड, नव्हांश वानखेडे हे जखमी झाले. या विद्यार्थ्यांना यशोदा रुग्णालयात तात्काळ हलविण्यात आले. काही विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले तर आदी प्रवीण वाघ या विद्यार्थ्याला सक्करदरा येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. आदीच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. तसेच त्याच्या कमरेच्या भागातही गंभीर दुखापत झाली आहे. त्याला डॉक्टरांनी दोन महिन्याचा विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आदी हा सातव्या वर्गाचा विद्यार्थी आहे. सोमवारपासून त्याची परीक्षा सुरू होणार आहे. त्याची आईसुद्धा त्याच शाळेत शिक्षिका आहे. विशेष म्हणजे आदी आज आईसोबत जाणार होता. परंतु व्हॅन लवकर आल्याने तो व्हॅनमध्ये शाळेत निघून गेला. या अपघातात व्हॅन चालकाचा कुठलाही दोष नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.