सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:32 PM2018-11-28T23:32:32+5:302018-11-28T23:35:18+5:30
सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक आहेत. हॉलमार्क परवान्यासाठी कायदा तयार झाला असला तरीही देशातील सराफांच्या दुकानांची संख्या पाहता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना शुद्धतेचे दागिने खरंच मिळतात काय, हा प्रश्न आहे. पारदर्शक व्यवहार आणि ग्राहक सेवेमुळे हॉलमार्कचे दागिने विकण्याचा मोठ्या शोरूमचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोन्याच्या शुद्धतेसाठी दागिन्यांवर हॉलमार्कच्या चार खुणा आवश्यक आहेत. हॉलमार्क परवान्यासाठी कायदा तयार झाला असला तरीही देशातील सराफांच्या दुकानांची संख्या पाहता केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने अजूनही अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे ग्राहकांना शुद्धतेचे दागिने खरंच मिळतात काय, हा प्रश्न आहे. पारदर्शक व्यवहार आणि ग्राहक सेवेमुळे हॉलमार्कचे दागिने विकण्याचा मोठ्या शोरूमचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे.
नागपुरात सराफांच्या संख्येच्या तुलनेत केवळ १५० जणांकडे हॉलमार्क परवाना आहे. हा परवाना भारतीय मानक ब्यूरोतर्फे (बीआयएस) दिला जातो. सध्या हॉलमार्क परवाना बंधनकारक नसल्यामुळे सराफांची छोटी दुकाने हॉलमार्क संदर्भात उदासिन आहेत. सण आणि लग्नसमारंभासाठी सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. पण शुद्धतेबाबत ग्राहक आवश्यक काळजी घेताना दिसत नाहीत. एवढंच नव्हे ग्राहकांमध्ये हॉलमार्कबाबत जागरुकता नाही. हॉलमार्कच्या चार खुणा नसल्यास सोन्याच्या शुद्धतेची हमी देता येत नाही. चार खुणा नसल्यास ज्वेलर्सचा परवाना रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे. केंद्राच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने हॉलमार्क परवाना बंधनकारक केल्यास ग्राहकांसोबत ज्वेलर्सचाही फायदा होईल, असे सराफांनी सांगितले.
एका सर्वेक्षणानुसार गेल्या काही वर्षांपासून सणासुदीत आणि लग्नसराईत मोठ्या शोरूममधून दागिन्यांची खरेदी वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे हॉलमार्क आहे. लहान दुकानांमध्ये दागिना हॉलमार्क नसल्यामुळे सोन्याचे कॅरेट समजत नाही आणि ग्राहक फसतो.
हॉलमार्कचा अर्थ आहे चार खुणा
- दागिन्यांवर पहिली खूण त्रिभूज आकाराचा बिंदू बीआयएसचे चिन्ह दर्शविते.
- दुसरी खूण सोन्याच्या कॅरेटची असते. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांचा कॅरेट ग्राहकांना समजतो.
- दागिन्यांची तपासणी केलेल्या प्रयोगशाळेची खूण असते.
- चौथी खूण म्हणजे ज्वेलर्सचा लोगो अथवा कोड असतो.
हॉलमार्कमुळे ग्राहकांना शुद्ध सोने मिळणार
हॉलमार्कच्या खुणा नसल्यास सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देता येत नाही. हॉलमार्कचा दागिना खरेदी केलेल्या ग्राहकांना विकताना दागिन्यांचे पूर्ण पैसे परत मिळतात. कायद्याच्या अंमलबजावणीची वाट न पाहता सराफांनी हॉलमार्क परवाना घ्यावा. त्यामुळे ग्राहकांचा सराफांवर विश्वास नक्कीच वाढेल.
आर.पी. मिश्रा, भारतीय मानक ब्यूरो,
सायंटिस्ट एफ अॅण्ड हेड.