मैत्री दिनी मित्राला दिली जीवनदानाची भेट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 10:27 AM2018-08-06T10:27:42+5:302018-08-06T10:33:13+5:30

नागपुरात यकृत (लिव्हर) निकामी होऊन मृत्यूच्या दारात असलेल्या गरीब मित्राच्या यकृत प्रत्यारोपणासाठी मित्रांनी पुढाकार घेत लाखोचा निधी उभा केला.

Friendship Day gifted to friend! | मैत्री दिनी मित्राला दिली जीवनदानाची भेट!

मैत्री दिनी मित्राला दिली जीवनदानाची भेट!

Next
ठळक मुद्देमित्रांनी गोळा केली लाखोंची रक्कमलिव्हर निकामी झालेल्या युवकावर प्रत्यारोपण

सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मैत्रीला कुठलेही बंधन नाही. ना जातीचे, ना वयाचे, ना गरिबी-श्रीमंतीचे. सुखदु:खाच्या प्रसंगी एकत्र आले की मैत्री अधिक दृढ होत जाते, असे म्हणतात. रविवारी मैत्री दिनी असाच प्रसंग घडला. यकृत (लिव्हर) निकामी होऊन मृत्यूच्या दारात असलेल्या गरीब मित्राच्या यकृत प्रत्यारोपणासाठी मित्रांनी पुढाकार घेत लाखोचा निधी उभा केला. बहिणीने यकृत देण्याची तयारी दर्शवली. तातडीने प्रत्यारोपण न झाल्यास युवकाच्या जीवाला धोका असल्याचे पाहत अवयव प्रत्यारोपण समितीने रविवार सुटीचा दिवस असतानाही एकाच दिवसात मंजुरी दिली.  त्या मित्रावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी व्हावी यासाठी सर्व मित्र रविवारी रात्रभर न्यू इरा हॉस्पिटलच्यासमोर देवाचा धावा करीत होते.
प्रणय कुऱ्हाडकर (२४) रा. गोळीबार चौक असे त्या मित्राचे नाव. तो मुंजे चौकातील एका कापडाच्या मोठ्या शोरूममध्ये कामाला आहे. प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती खालवली होती. घराशेजारील डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. परंतु आजार वाढतच होता. अखेर त्याला धंतोली येथील खासगी रुग्णालयात भरती केले. तिथे विविध तपासण्या केल्यावर यकृत निकामी झाल्याचे निदान झाले. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला देऊन लकगडगंज येथील न्यू इरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी प्रणयला त्या हॉस्पिटलमध्ये दाखल तर केले, परंतु प्रत्यारोपणासाठी लागणारा लाखो रुपयांचा निधी कसा उभा करणार हा प्रश्न होता. याची माहिती त्याच्या सोबत शोरूममध्ये काम करणाऱ्या मित्रांना मिळाली. त्यांनी एकमेकांना मोबाईलद्वारे प्रणयच्याबाबत माहिती देऊन आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. देशभरातील या कापडाच्या शोरूमचे चार सेंटर आहेत. तिथे काम करण्यापर्यंतच हा मॅसेज पोहचला. आणि पाहतापाहता लाखो रुपयाचा निधी जमा होऊ लागला. मित्रांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. डॉक्टरांना निधी जमा होत असल्याचे सांगत प्रत्यारोपणाची तयारी सुरू करण्याची विनंती केली.
भावाचा जीव वाचविण्यास २३ वर्षीय बहीण समोर आली. परंतु आता अडचण होती ती अवयव प्रत्यारोपण समितीकडून तातडीने मंजुरीची.
समितीचे अध्यक्ष मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे आहेत. यामुळे प्रणवच्या मित्रांनी मेडिकलमध्ये धाव घेतली. रविवारी दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मेडिकलमध्ये भरती असलेले ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे यांच्या भेटीसाठी येणार असल्याने डॉ. निसवाडे उपस्थित होते. मित्रांनी डॉ. निसवाडे यांना विनंती केली. परंतु रविवार सुटीचा दिवस त्यात समितीचे काही सदस्य नागपूर बाहेर असल्याने परवानगी मिळणे कठीण असल्याची कल्पना त्यांनी दिली. याच दरम्यान न्यू इरा हॉस्पिटलचे यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. राहुल सक्सेना मेडिकलमध्ये पोहचून रुग्णाची गंभीर स्थिती सांगितली. प्रत्यारोपण न झाल्यास जीवाला धोका असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. निसवाडे यांनी तातडीने आपल्या स्टाफला बोलवून घेतले. नागपुरात उपस्थित समितीच्या इतर सदस्यांना बोलवून घेत त्यांच्यासमोर हे प्रकरण ठेवले. बराच वेळ बैठक चालली. बाहेर मित्रांनी गर्दी केली होती. अखेर सर्व सदस्यांनी मिळून मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय बाहेर येताच मित्रांच्या डोळ्यात अश्रू होते.

न्यू इरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच ‘लाईव्ह ट्रान्सप्लांट’
न्यू इरा हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सात यकृत प्रत्यारोपण यशस्वी पार पडले. परंतु हे सर्व प्रत्यारोपण मेंदूमृत व्यक्तीकडून मिळालेल्या अवयवाचे होते. नागपुरात पहिल्यांदाच ‘लाईव्ह लिव्हर ट्रान्सप्लांट’ होत आहे. हे यशस्वी झाल्यास अवयव प्रत्यारोपणामध्ये नागपूर आघाडी घेण्याची शक्यता आहे.

Web Title: Friendship Day gifted to friend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.